दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री
मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 10) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे म्हटले. त्यामुळे राज्यात पुन्हा गतवर्षीसारखा लॉकडाऊन लागणार अशी चिन्हे आहेत. या संदर्भात टास्कफोर्सची बैठक घेण्यात येणार असून, यात लॉकडाऊन कसा घ्यायचा याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, हा लॉकडाऊन सुरुवातीला 15 दिवसांचा असेल, असे म्हटले जात आहे.
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येवर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महाविकास आघाडीतील मंत्री, नेत्यांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.
या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे. नाही तर 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, असा इशारा दिला आहे. या वेळी त्यांनी सर्वांसमोर कोरोनासंबंधी सादरीकरणही केले.
या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सामान्यांचा उद्रेक होणार नाही असा निर्णय घ्यावा, आमचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे. वेगवेगळ्या घटकांचा विचार व्हावा, लोकांसाठी
काय प्लॅनिंग आहे हे स्पष्ट करावे, असे सूचित केले.
…तर जनतेचा उद्रेक होईल -फडणवीस
मुंबई ः राज्यातील कोरोनाच्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या परिस्थितीवर लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत म्हटले आहे, मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण लॉकडाऊनला विरोध केला आहे. पूर्ण लॉकडाऊन लागू केला तर जनतेचा उद्रेक होईल, असे फडणवीस म्हणाले.
कोरोनाचा उद्रेक किती दिवस राहिल हे सांगता येत नाही. त्यामुळे व्यवस्था तत्काळ उभ्या कराव्या लागतील. कठोर निर्बंध लावावेत, मात्र जनता व व्यापार्यांच्या भावनाही लक्षात घ्या. मागील वर्ष लोकांसाठी अडचणीचे ठरले आहे. अद्याप लोकं वीज बिल भरू शकले नाहीयेत. जनतेला आर्थिक पॅकेज दिले गेले पाहिजे. राज्यावरील कर्ज वाढत असेल तरी चालेल, पण लोकांना आर्थिक पॅकेज द्या, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणीचे अहवाल तत्काळ दिले गेले पाहिजेत. खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. ऑक्सिजनची कमी आहे. रेमडेसिवीर लवकरात लवकर उपलब्ध केले पाहीजे. या सर्व बाबतीत राज्य सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. आरोग्य सुविधा वाढवाव्यात, असेही फडणवीस यांनी सूचित केले.
राज्य सरकारला जबाबदारीही घ्यावी लागेल -मुनगंटीवार
राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत जाहीर केले. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करीत फक्त लॉकडाऊन लागू केला म्हणजे आपले काम झाले असे न करता राज्य सरकारला जबाबदारीदेखील घ्यावी लागेल, असे म्हटले आहे.
मुनगंटीवार म्हणाले, लॉकडाऊनचा निर्णय तर्कावर आधारित होईल, पण लॉकडाऊन करताना काही पथ्ये ठेवावी लागतील. काही नियोजन करावे लागेल. सरकारला काही जबाबदारी घ्यावी लागेल. फक्त लॉकडाऊन केले की आपले कार्य संपले असा विचार सरकारने करू नये. या संदर्भात सर्वसामान्यांसाठी पॅकेजचा निर्णय घेतला जाईल का? महिन्याला इएमआय भरणार्यांसाठी सरकार काही करणार आहे का? छोटे दुकानदार, व्यापारी, उद्योजक, फुटपाथवरील फेरीवाले यांच्या बाबतीत सरकारची काय भूमिका आहे? नगर परिषद, महानगरपालिका यांच्या मार्केट-कॉम्प्लेक्समधील दुकानदारांना आपण दुकाने बंद करायला लावतो आहोत. त्यांच्या भाड्याच्या पैशांचे काय करणार? अशा अनेक मुद्द्यांवर सरकारने चर्चा करायला हवी.