Breaking News

भाजपचे इनकमिंग वाढतेय

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे इनकमिंग जोरात वाढू लागलेले आहे. दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांच्या अरेरावीला कंटाळूनच हे नाराज नेते आता भाजपच्या प्रवाहात सहभागी होत आहेत. यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात भाजपचे इनकमिंग जोरात सुरू झालेले आहे, हे नक्की.

लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तप्त होऊ लागलेले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. अपवादात्मक जागेचा येत्या दोन दिवसात फैसला होणार आहे. बहुतांशी मतदारसंघात दुहेरी, तिहेरी अशी रंगतदार लढत होणार आहे. भाजप, शिवसेना, रिपाइं महायुती विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी असा सामना रंगणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने विविध पक्षांची नाराज नेतेमंडळी आयाराम, गयारामची भूमिका निभावताना दिसत आहेत. विशेष करून काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठा फटका बसू लागला आहे. दोन्ही पक्षांतील नाराज मंडळींची संख्याही लक्षणीय अशीच आहे. आतापर्यंत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या नाराज मंडळींना उमेदवारीच्या आश्वासनावर झुलत ठेवत आपला राजकीय स्वार्थ साधला. प्रत्यक्षात ज्या वेळी निवडणुकीत उमेदवारी द्यायची वेळ आली तेव्हा दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना खड्यासारखे बाजूला करीत आपल्या सग्यासोयर्‍यांची वर्णी लावल्याने संतप्त झालेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भाजप, शिवसेनेची वाट धरणे पसंत केले. या पक्षांतरबाजीचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादीसह काँग्रेसला देखील बसला आहे. नगरमधील विखे-पाटील घराण्याचे वारसदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेसला राम राम ठोकत यापूर्वीच भाजपत प्रवेश केला आहे. भाजपने देखील त्यांना नगरमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. आता नांदेडमधील नेते अब्दुल सत्तार यांनीही काँग्रेसला राम राम ठोकत भाजपत प्रवेश करण्याचे जाहीर केले आहे. आणखी एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागला आहे. काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपत प्रवेश करणार आहेत. सोमवारी संध्याकाळी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. राष्ट्रवादीनंतर भाजपने काँग्रेसलाही खिंडार पाडले आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण हे तीन तालुके माढा मतदारसंघात येतात. या भागात रणजितसिंह यांचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपसाठी फायद्याची ठरू शकते. सुजय विखे, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि भारती पवार यांच्यानंतर आता रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचं नाव भाजपबरोबर जोडलं जाणार आहे.   अंतर्गत कलहामुळे त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. परभणीतील राष्ट्रवादीचे माजी खासदार गणेश दुधगावकर यांचे पुत्र समीर दुधगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. समीर दुधगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. एकूणच सध्या भाजपचे इनकमिंग जोरात सुरू आहे हे नक्की.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply