उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील पूर्व विभागात मागील आठवडा भरात वीज पुरवठा खंडित होत असून, यामुळे अनेकांना त्याचा फटका बसत आहे. गावखेड्यातील लघुउद्योगांवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. अचानक खंडित होणार्या विज पुरवठ्यामुळे अनेकांच्या घरातील विजेची उपकरणे नादुरुस्त होत आहेत. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मागील चार महिने हाताला कोणत्याही प्रकाचे काम नसलेल्या सामान्य नागरिकांना ही विजेची उपकरणे खरेदी करणे दुरापास्त झाले आहे. हिवाळा व उन्हाळ्याच्या आठ महिन्यात वीज वितरण कंपनीला जागोजागी वाकलेले, सडलेले विद्युत पोल आणि लोंबकळत्या विद्युत तारा यांची दुरुस्ती करायला वेळ पुरत नाही. मात्र ग्राहकांचे एखाद-दुसरे विजबिल थकल्यास संबंधित ग्राहकांचे वीज पुरवठयाचे कनेक्शन कापण्यास विज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना तत्काळ वेळ देता येते असा येथील ग्राहकांचा अनुभव आहे. त्यातच कोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे एकदाच तीन महिन्यांची आकारणी करण्यात आलेल्या वीजबिल लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत आर्थिक परिस्थितीमुळे गरीब व सामान्य ग्राहकांची या अवाजवी विद्युत बिलामुळे चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आहे. मात्र विजेच्या दुरुस्तीसाठी महावितरण कंपनीचे प्रयत्न अपुरे पडत असल्याची खंत येथील वीजग्राहक करीत असून, महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांना होणार्या त्रासाबाबत विविध स्तरावर निवेदनेही देण्यात आली आहेत. वीज वितरण कंपनीचे अधिकारी गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने उरण पूर्व विभागातील नागरिक हैराण झाले आहेत.