Breaking News

गैरप्रकारांना आळा हवाच

कोरोना या घातक विषाणूचा फैलाव जसजसा वाढत गेला आणि या महामारीत मोठ्या संख्येने जीवितहानी होऊ शकते हे स्पष्ट झाले तसतशी कोरोनाची भीती फैलावाइतकीच झपाट्याने वाढत गेली आहे. या भीतीच्याच जोरावर काही नफेखोर सर्वसामान्यांना कोंडीत पकडून त्यांची नाना तर्‍हेने आर्थिक लुटमार करीत आहेत. खाजगी हॉस्पिटलांकडून रुग्णांची केली जाणारी लूट आणि औषधांचा काळाबाजार हे गैरप्रकार त्याचाच भाग असून त्यांना आळा बसायलाच हवा. कोरोनामुळे जनजीवन जवळपास ठप्प झाले असले तरी या साथीच्या फैलावासोबतच जमेल त्या मार्गाने केली जाणारी नफेखोरीही तितक्याच जोमाने बोकाळली. याची चाहूल अगदी सुरुवातीलाच लागली ती कोरोनापर्वात प्रत्येकासाठी अत्यावश्यक आणि बंधनकारक ठरलेल्या मास्कच्या नफेखोर विक्रीतून. जसजसा कोरोनाचा फैलाव वाढत गेला आणि या महामारीचे भयावह स्वरुप सर्वसामान्यांच्या ध्यानात येत गेले तसतशी कोरोनाविषयीची भीतीही दुणावत गेली. सार्वजनिक वैद्यकीय व्यवस्थेवरील ताणापोटी स्वाभाविक गरजेतून या महामारीच्या व्यवस्थापनात खाजगी हॉस्पिटल्सना सामावून घेणे भाग पडले. या संकट काळातही व्यापारी वृत्तीची ही नफेखोर खाजगी इस्पितळे रुग्णांची लुबाडणूक करण्यास किंचितही कचरली नाहीत. खाजगी हॉस्पिटलांकडून अनेक रुग्णांच्या माथी अफाट बिले मारली गेल्यानंतर बराच गहजब झाला, तेव्हा कुठे महाराष्ट्रातील राज्य सरकारला जाग येऊन त्यांनी कोविड रुग्णांकडून खाजगी हॉस्पिटलांनी प्रतिदिन किती दर आकारणी करावी यावर काही मर्यादा आणली. परंतु त्याउप्पर खाजगी हॉस्पिटलांकडून होणारी ही लूट अजूनही थांबलेली नाही. अशाच स्वरुपाचा गैरप्रकार पनवेलमधील पॅनेसिया हॉस्पिटलकडून सुरु असल्याचे ध्यानात आल्यामुळे महापालिका आयुक्तांनी या हॉस्पिटलची कोविड-19 रुग्णालय ही मान्यता रद्द केली आहे. अर्थातच अशा स्वरुपाचे गैरप्रकार अन्यत्रही झाले असून शासकीय यंत्रणेने सजग राहून सर्वसामान्यांच्या तक्रारींची तत्परतेने दखल घेण्याची गरज आहे. एकीकडे या कोरोना विषाणूच्या स्वरुपाविषयी तज्ज्ञांनाही पुरती माहिती नाही. या साथीवर प्रभावी ठरतील अशी नेमकी औषधे अथवा लस नाही. यामुळेच कोरोनाची दहशत संसर्ग झालेल्यांना भांबावून टाकते. त्यांच्या या अवस्थेचाच संबंधित क्षेत्रातील नफेखोरांकडून गैरफायदा घेतला जात आहे. रेमडेसिवीर हे औषध कोविड-19च्या रुग्णांवर प्रभावी ठरत असून त्यांच्या प्रकृतीत या औषधामुळे वेगाने सुधारणा होते हे ध्यानात आल्यापासून या औषधाची मागणी प्रचंड वाढली. अर्थातच मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडू लागला. आपल्याकडे दिल्ली-मुंबईसह इतरही काही शहरांत या औषधाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु झाल्याच्या तक्रारी आल्या. या औषधाची किंमत पाच हजार 400 रुपये असली तरी काळ्याबाजारात मात्र हे औषध 45 ते 70 हजार रुपयांना विकले जात आहे. या औषधाची विक्री थेट हॉस्पिटलला केली जावी असे बंधन असतानाही काही लोकांनी प्रिस्क्रिप्शनमध्ये फेरफार करुन याचा साठा लांबविलाच. आता कुठे राज्य सरकारला जाग येऊन मेडिकल दुकानांवर छापे घालणे आदी दिखाव्याची कारवाई सुरु झाली आहे. लवकरच या औषधाचे उत्पादन व पुरवठा अन्य एक-दोन कंपन्यांकडूनही होणार असल्यामुळे काळ्या बाजाराला खर्‍या अर्थाने अटकाव होईल अशी अपेक्षा आहे. नुकतेच ठाण्यातील एका पालिका रुग्णालयाने रुग्णाचा मृतदेह भलत्याच कुटुंबाच्या हवाली केल्याचे व अन्य रुग्णाचे उपचार वेगळ्याच नावाने सुरु ठेवल्याचे प्रकरण भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी उजेडात आणले. वैद्यकीय व्यवस्थेवरील ताण लक्षात घेतला तरी अशी अक्षम्य हेळसांड होता कामा नयेच.

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply