पनवेल : प्रतिनिधी
पनवेलमधील पॅनेसिया हॉस्पिटलची कोविड रुग्णांकडून अतिरिक्त बिल आकारणी केल्यामुळे महापालिका आयुक्तांनी कोविड -19 रुग्णालय म्हणून दिलेली मान्यता रद्द केली आहे. रुग्णांकडून तक्रारी आल्यावर सूचना देऊनही व्यवस्थापनाने बदल न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीत वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाच्या उपचारासाठी खाजगी कोविड हॉस्पिटल आवश्यक असल्याने महापालिका आयुक्तांनी खाजगी रुग्णालयांना कोविड -19 रूग्णालय म्हणून मान्यता दिली आहे. त्यामध्ये पनवेलमधील पॅनेसिया हॉस्पिटलचाही समावेश होता. या रुग्णालयात शासनाने निश्चित केलेल्या शुल्कामध्ये उपचार देण्यात येणार होते.परंतु कोविड-19 रुग्णालय म्हणून मान्यता मिळाल्यानंतर या रुग्णालय कोविड रुग्णांकडून शासनाने निश्चित केलेल्या शुल्का पेक्षा जास्त बिल आकारणी करीत असल्याच्या तक्रारी आल्या. तसेच याबाबत व्यवस्थापनाला सूचना देऊनही काहीच बदल न झाल्याने महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पॅनेसिया हॉस्पिटलची कोविड-19 रुग्णालय म्हणून दिलेली मान्यता रद्द केली.