Breaking News

सिडको अर्बन हाटमध्ये शिल्प मेळा महोत्सव

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा

दिवाळीपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या हस्तकला प्रदर्शनाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर सिडको अर्बन हाट येथे 18 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत शिल्प मेळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिल्प मेळ्यात विविध राज्यांतील कारागीर सहभागी होणार असून त्यांनी निर्मिलेली हातमाग व हस्तकला उत्पादने या वेळी प्रदर्शनार्थ मांडण्यात येणार आहेत.

आयोजकांकडून कोविडविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच महोत्सवासाठी येणार्‍या रसिकांना प्रवेश दिला जाणार आहे. अर्बन हाटला भेट द्यायला येणार्‍यांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच प्रवेशद्वारावरच थर्मल स्कॅनिंग व सॅनिटायझर किंवा हॅण्ड वॉशने निर्जंतुकीकरण केल्यानंतरच आत प्रवेश देण्यात येईल. पर्यटकांना स्टॉलभोवती गर्दी करण्यासही मनाई आहे. अर्बन हाटचा परिसर खुला असल्याने तसेच तेथे उभारण्यात येणारे स्टॉल्स आकाराने मोठे असल्याने सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे शक्य होणार आहे.

देशाच्या विविध भागांतील कारागिरांनी निर्मिलेल्या स्वदेशी उत्पादनांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने अर्बन हाट येथे आयोजित करण्यात येणार्‍या विविध महोत्सवांमध्ये ही उत्पादने प्रदर्शन व विक्रीकरिता मांडण्यात येतात. शिल्प मेळ्यामध्ये महाराष्ट्र व अन्य राज्यांतील भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (ट्रायफेड) आणि स्वयंसहाय्यता गटांतील कारागीर सहभागी होणार आहेत. रेशमी साड्या, ड्रेस मटेरिअल, चामड्याची उत्पादने, चित्र, कृत्रिम दागिने, ब्लॉक प्रिंट, गालीचे, पायपुसणी, सुती पिशव्या, सौंदर्य प्रसाधने, लखनऊ चिकन ड्रेस मटेरिअल, खादीचे कुर्ते, जेन्ट्स वेअर अशी विविध उत्पादने येथे उपलब्ध असणार आहेत. हातमाग व हस्तकला उत्पादनांव्यतिरिक्त या मेळ्यामध्ये जैविक खाद्य उत्पादनेही (ऑरगॅनिक फूड) उपलब्ध असणार आहेत. याशिवाय अर्बन हाटच्या निसर्गरम्य परिसरात निसर्ग भ्रमणाची (नेचर ट्रेल) संधीही पर्यटकांना मिळणार आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply