उरण ः वार्ताहर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण तालुक्यात 13 ते 16 जुलै या कालावधीत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरण मोरा येथील हनुमान कोळीवाडा येथे मंगळवारी (दि. 14) कडक नाकाबंदी करण्यात आली. यात बाइकवर डबल सीट जाणे, हेल्मेटचा वापर न करणे, लायसन्स नसणे त्याचप्रमाणे गाडीची कागदपत्रे नसणे, विनाकारण फिरणे असे कृत्य करणार्यांवर भा. दं. वि. कलम 188नुसार कारवाई करण्यात आली. या नाकाबंदीत मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रहार पाटील, पोलीस शिपाई बोरेकर, पोलीस नाईक डी. आर. पाटील असे एकूण सात अंमलदार व एक अधिकारी सहभागी होते.
कोविडचा प्रसार थांबविण्यासाठी उरण तालुक्यामध्ये लॉकडाऊन करणे गरजेचे आहे आणि यापूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने कोविड हा साथीचा रोग म्हणून घोषित केला आहे. त्या अनुषंगाने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी काही आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे.
साथरोग अधिनियम 1897च्या कलम 2 अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या सर्व संबंधित तरतुदींसह प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून तसेच जिल्हाधिकार्यांच्या पूर्व मान्यतेने उपविभागीय अधिकारी पनवेल यांनी संपूर्ण उरण तालुका कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.
त्यानुसार 13 जुलै रोजी पहाटे 5 वाजल्यापासून ते 16 जुलैला रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार याचा कालावधी वाढविण्यात येईल तसेच संपूर्ण उरण तालुक्यात अत्यंत प्रभावीपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल. उपविभागीय अधिकारी (पनवेल) दत्तू नवले यांनी उरण तहसीलदारांना दिलेल्या पत्रानुसार या कालावधीत नियमांच्या कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था यांच्यावर महामारी रोग अधिनियम 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत इतर संबंधित कायदे व नियमांच्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल.