Breaking News

मुंबईवर दिल्ली भारी!

मुंबई : प्रतिनिधी

घरच्या मैदानावर आपला पहिला सामना खेळणार्‍या मुंबई इंडियन्सला सलामीच्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबईवर 37 धावांनी मात करीत बाराव्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. दिल्लीने दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 176 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

मुंबईकडून युवराज सिंग आणि कृणाल पांड्याचा अपवाद वगळता एकही फलंदाज दिल्लीच्या गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. युवराजने अखेरपर्यंत आपली झुंज कायम ठेवत अर्धशतक झळकावले. त्याला कृणाल पांड्यानेही चांगली साथ दिली, मात्र दिल्लीच्या गोलंदाजांपुढे आघाडीच्या फलंदाजांची डाळ शिजू शकली नाही. सलामीवीर रोहित शर्मा, क्विंटन डी-कॉक ठराविक अंतराने माघारी परतल्यामुळे मुंबईला सुरुवातीलाच मोठे धक्का बसले होते. दिल्लीकडून इशांत शर्मा आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी दोन, तर ट्रेंट बोल्ट, तेवतिया, केमो पॉल व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

त्याआधी शिखर धवन, कॉलिन इन्ग्राम आणि ऋषभ पंत या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सलामीच्या सामन्यात 213 धावांचा डोंगर उभारला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या मुंबईची सुरुवात चांगली झाली, मात्र मोक्याच्या क्षणी दिल्लीची भागीदारी मोडणे मुंबईच्या गोलंदाजांना जमले नाही.

सलामीवीर पृथ्वी शॉ आणि कर्णधार श्रेयस अय्यर झटपट माघारी परतल्यानंतर शिखर धवन आणि कॉलिन इन्ग्राम यांनी तिसर्‍या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीने दिल्लीचा डाव सावरला, मात्र या दोन्ही फलंदाजांना आपली अर्धशतक पूर्ण करता आली नाही. यानंतर मधल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या ऋषभ पंतने मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. केवळ 18 चेंडूंत अर्धशतक झळकावत पंतने आपल्या संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. मुंबईकडून मिचेल मॅक्लेनघनने तीन; तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, बेन कटींग यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply