Breaking News

विश्रांतीनंतर मच्छीमार नौका समुद्रात रवाना

मुरूड : प्रतिनिधी
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर 1 ऑगस्टपासून मच्छीमार नौका पुन्हा खोल समुद्रात रवाना झाल्या आहेत. नव्या हंगामात तरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी आशा मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कोकणाला 720 किमीचा सागरी किनारा लाभला असून, या अरबी समुद्रात मासेमारी करून सुमारे पाच लाख मच्छीमार आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात, पण सरते वर्ष मच्छिमारांसाठी खूप त्रासदायक ठरले. अवकाळी पाऊस, वादळांची मालिका, त्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग, लॉकडाऊन, वाहतूक बंद अशा अनेक कारणांमुळे कोळी बांधव पुरते हैराण झाले आहेत.
शासनाच्या नियमाप्रमाणे 1 जून ते 31 जुलै अशी मासेमारी बंद ठेवण्यात येत असते. दोन महिन्यांचा हा काळ पूर्ण झाला आहे. त्यानंतर आता मच्छीमार नव्या हंगामाची सुरुवात करणार आहेत. आपल्या बोटींमध्ये तांदूळ, रॉकेल, तेल, मसाले अशा रोजच्या भोजनासाठी लागणारे साहित्य तसेच मासळीच्या साठवणुकीसाठी बर्फ घेऊन कोळी लोक खोल समुद्रात रवाना झाले आहेत. या हंगामात मासे कसे मिळतात यावर त्यांचे जीवनमान अवलंबून असणार आहे.

मच्छीमारांचा नवीन हंगाम सुरू होत आहे. गेल्या वर्षभरात अनेक संकटे कोळी बांधवांवर ओढवली. आता नवीन आशा-अपेक्षा घेऊन आमचे मच्छीमार खोल समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा.
-मनोहर बैले, उपाध्यक्ष,रायगड जिल्हा मच्छीमार संघ

शासनाने आम्हाला मासळी विक्रीसाठी कुलाबा येथील मोठे मच्छी मार्केट उपलब्ध करू दिले पाहिजे तसेच लॉकाडाऊन पूर्णता बंद करणे आवश्यक आहे. तेव्हाच कोळी बांधव सावरेल नाही तर पुरता कर्जात बुडेल.
-दशरथ मकू, मच्छीमार

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply