मुंबई : प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी विदर्भ खान्देश मातंग सेवा संघ या संस्थेने केली असून याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच दिले आहे.
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दीवर्ष निमित्त त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याकरिता केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचे निवेदन देण्यात आले. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात अण्णाभाऊ यांनी मोलाचे कार्य केले होते. प्रत्येक मराठी मनात मुंबई महाराष्ट्राची अस्मिता डफावर थाप मारून शाहिरी व पोवाड्यातून त्यांनी पेरण्याचे कार्य केले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया येथे त्यांनी म्हणून दाखविला. तमाशा या कलेचे त्यांनी लोकनाट्य असे नामकरण केले.
आपल्या प्रभावी लेखणीने त्यांनी नेहमी समाजातील दलित उपेक्षित शोषित पीडितांच्या अन्यायाला धारदार शब्दांनी वाचा फोडली या महान अशा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या थोर साहित्यिकास महाराष्ट्र शासनाने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारकडे शिफारस करून त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या वेळी संस्थापक राजू मानकर, अध्यक्ष गजानन वानखेडे, अरुण कांबळे, नारायण तायडे, समाधान म्हस्के, अशोक वैराळ, सुनील भालेराव विजया वानखडे, शशिकला बोर्ले आदी उपस्थित होते.