अलिबाग : प्रतिनिधी
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सण एकाच दिवशी साजरे करण्याचा दुग्धशर्करा योग सोमवारी (दि. 3) जुळून आला, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही सण साधेपणाने साजरे झाले.
बर्याचदा नारळी पौर्णिमा झाल्यावर दुसर्या दिवशी रक्षाबंधन साजरे होते. सलग दोन दिवस येणार्या सणांमुळे त्याचे वेगळेपणही दिसून येते. लहान-थोरांमध्ये त्याचा उत्साह असतो. या सणाच्या निमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल होते. राख्या खरेदीसाठी बहिणी बाहेर पडल्याने रविवारी बाजारात गर्दी दिसून आली. एकीकडे आनंद तर दुसरीकडे कोरोनाची भीती या दुहेरी मनस्थितीत ही खरेदी सुरू होती.
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा दोन्ही सण सोमवारी एकाच दिवशी साजरे झाले. ज्या बहिणींना भावाच्या घरी जाणे शक्य होते त्यांनी तेथे जाऊन भावाला राखी बांधली, तर कोरोनाच्या भीतीने काहींनी पुढल्या वर्षी रक्षाबंधन जोशात साजरा करण्याचा निर्णय घेतला.
कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमा महत्त्वाची मानली जाते. खवळलेला समुद्र शांत करण्यासाठी त्याला नारळ अर्पण केला जातो. त्यानंतर कोळी लोक बोटी समुद्रात घेऊन मासेमारीसाठी जातात. नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा मात्र तो उत्साह दिसला नाही. ना मिरवणूक, ना जल्लोष! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून साधेपणाने नारळी पौर्णिमा साजरी झाली.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …