Breaking News

चाकूचे वार करून मोबाईलची चोरी

पनवेल : बातमीदार

ट्रेलरचालकावर चाकूचे वार करून अज्ञात इसमाने त्याचा मोबाईल लंपास केल्याची घटना पनवेल हायवेलगत असलेल्या जेडब्ल्यूआर या कंपनीच्या बाहेर घडली. शहर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ब्रिजेश सत्यनारायण यादव (वय 29) हे ओवळे येथे राहत असून, एमएच 46-एआर 9072 या ट्रेलरवर चालकाचे काम करतात. त्यांनी पनवेल हायवेलगत असलेल्या जेडब्ल्यूआर या कंपनीच्या बाहेरील रस्त्यावर आपल्या ताब्यातील ट्रेलर उभा करून ठेवला होता व ते या ट्रेलरमध्ये झोपले होते. या वेळी लघुशंका आल्याने ते मोबाईल घेण्यास गेले असता, त्यांना मोबाईल दिसून आला नाही, तसेच ट्रेलरच्या खाली कसला तरी आवाज आल्याने ते खाली उतरले. या वेळी एक इसम मोबाईल घेऊन जात असताना दिसला. या वेळी लागलीच त्याच्या पाठीमागे जाऊन त्यांनी त्यास पकडले. या वेळी अज्ञात इसमाने यादव यांचा मोबाईल अंधारात फेकून दिला. त्यातून यादव व त्या इसमाची बाचाबाची व झटापट झाली. या वेळी अज्ञात इसमाने त्याच्याजवळील चाकू सारखे अवजार काढून यादव यांच्या पोटास दोन ठिकाणी, डाव्या हाताच्या खांद्यास व डाव्या डोळ्याजवळ वार करून जखमी केले आहे व आरोपी पळून गेला. याप्रकरणी शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

चोराला अटक; दोन दुचाकी हस्तगत

कळंबोली पोलिसांनी दुचाकी चोरणार्‍या 18 वर्षीय आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

कळंबोली पोलीस ठाणे हद्दीतून दोन महिन्यांपूर्वी पल्सर मोटारसायकलची चोरी झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी नन्हेलाल सभाशंकर यादव (नावडे कॉलनी, मूळ गाव उत्तर प्रदेश) याला वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड, सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण, हवालदार ब्रह्मदेव जाधव यांनी ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गाडी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडे आणखी चौकशी केली असता, कळंबोली परिसरातून 1 फेब्रुवारी रोजी अ‍ॅक्टिव्हा गाडीची चोरी केल्याचीदेखील कबुली त्याने दिली. या दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

तळोजातून दुचाकीची चोरी

चिंध्रण येथील विनोद गोपीनाथ पवार यांनी हंक कंपनीची (एमएच 43-एए 3114) मोटरसायकल तळोजा येथील अप्कोटेक्स कंपनीचे गेट नंबर 2च्या उजव्या साईडला असलेल्या पार्किंग जागेत पार्क करून ठेवली होती. चोरट्यांनी ती चोरून नेली आहे. तळोजा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply