पनवेल : बातमीदार
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची सांगता नुकतीच कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात झाली. सप्ताहात सहभाग घेणार्या अनेक संस्था आणि व्यक्तींचा या वेळी सन्मान करण्यात आला.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक पोलिसांच्या वतीने हेल्मेट रॅली, नेत्रचिकित्सा शिबिर, चित्रकला स्पर्धा, जनजागृती करण्यात आली. 9 ते 13 फेबु्रवारी या दरम्यान अतिशय प्रभावीपणे सप्ताह साजरा केला गेला. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, संगीतकार रवी शंकर नारायण, प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 11) सायंकाळी सांगता समारंभ झाला. या वेळी नवी मुंबई आणि पनवेल परिसरात शाळेतील विद्यार्थ्यांनी संचलन करीत उपस्थितांना सलामी दिली. त्यामध्ये वाशी येथील मॉडर्न स्कूल, बेलापूरमधील विद्यानिकेतन, एमजीएम विद्यालय नेरूळ, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे कळंबोली हायस्कूल यांचा समावेश होता. सुधागड शाळा व ज्ञानपुष्प विद्यालयाच्या आरएसपी विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक संचलन करून उपस्थितांची मने जिंकली. संचलन करणार्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
उपस्थितांना हेल्मेट, सिट बेल्ट, वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये या विषयावर तयार करण्यात आलेल्या डॉक्युमेंट्री दाखविण्यात आल्या. त्याचबरोबर अकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून एकच जल्लोष करण्यात आला. युवा संस्था, एसटीईपी फोर्ड, या सप्ताहाला मदत करणार्या संस्थांचे कौतुक करण्यात आले. या वेळी परिमंडळ 1 व 2चे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी, वाहतूक, आरटीओचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आरएफच्या जवानांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.