मंगळवारपासून मुंबई आणि आसपासच्या परिसराला वादळी वार्यांसह जोरदार पावसाने झोडपले असून मुंबईत तर अनेकांना 26 जुलैची आठवण व्हावी अशी परिस्थिती दिसून आली. गेली कित्येक वर्षे महापालिकेत सत्ता असूनही शिवसेनेला देशाच्या आर्थिक राजधानीला प्रतिवर्षी तुंबई होण्यापासून वाचवण्यावर उपाययोजना करता आलेली नाही. राज्यात अन्यत्र पूरस्थिती निर्माण झाल्यास हे गोंधळलेले सरकार काय करणार हा प्रश्नच आहे.
ऑगस्टच्या 4 आणि 5 तारखेला मुंबईत अतिवृष्टी होईल अशी पूर्वसूचना देऊन हवामान खात्याने रेड अॅलर्ट जारी केला होता. विक्रमी उंचीच्या लाटांची माहितीही हातात होती. जोरदार पाऊस आणि भरती एकत्र आल्यास मुंबईत पाणी तुंबणार हे अपेक्षितच होते. परंतु प्रत्यक्षात बुधवारी मुंबईची ज्या तर्हेने तुंबई झाली ती स्थिती अपेक्षेपेक्षाही भयावह होती. नेहमीच्या सखल भागांमध्ये पाणी साचलेच, पण कधी नव्हे ती दक्षिण मुंबईही पूर्णत: जलमय झाली. असंख्य झाडे कोसळली, भिंती खचल्या. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र अवघ्या आपत्तीचे खापर बदलत्या हवामानावर फोडून मुंबई पुन्हा अधिक खंबीरपणे उभी राहील वगैरे नेहमीचीच विधाने केली. वास्तवत:, यंदा नालेसफाई पूर्णपणे झालेली नाही. ब्रिमस्टोवॅड प्रकल्प व पंपिंग स्टेशनचे कामही धिम्या गतीने सुरू आहे याकडे भाजपच्या शहरातील नेत्यांनी महापालिकेचे लक्ष वेधले होते. परंतु 113 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करून मुंबई महापालिका प्रशासन मोकळे झाले. आता ही नालेसफाई होती का हातसफाई अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या भोंगळ कारभारावर टीका केली आहे. आम्ही पंपिंग स्टेशन बांधत आहोत असे ही श्रीमंत महापालिका आणखी किती वर्षे सांगणार आहे? मुंबई महापालिकेने धोकादायक ठिकाणांची यादी केली होती. त्या यादीचे पुढे काय झाले? यापैकी किती ठिकाणी खबरदारीची काही उपाययोजना करण्यात आली असे प्रश्न फडणवीस यांनी विचारले आहेत. त्यांची उत्तरे सत्ताधारी पक्षाने द्यावीत. दक्षिण मुंबईत रस्त्यांवर इतके पाणी साचले की लोकांना आपल्या गाड्या सोडून निघून जावे लागले. लोकल रेल्वेने तूर्तास फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी प्रवास करतात. पावसात अडकून या लोकांचे जे हाल झाले त्याला पारावार नाही. यापैकी अनेक जण हे मुंबई बाहेरून म्हणजे कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई-पनवेल येथून मुंबईत कामासाठी जाणारे आहेत. यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी कोणाची आहे? मुंबईत वर्षानुवर्षे सत्ता हातात असून ही परिस्थिती आहे तर राज्यात अन्यत्र पूरस्थिती उद्भवल्यास हे गोंधळलेले सरकार काय करणार आहे? सांगली, कोल्हापूर येथे नद्या धोक्याची पातळी ओलांडू लागल्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तिथे लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आधीच आवश्यक ती उपाययोजना केली जाईल अशी अपेक्षा आहे. पनवेल परिसरातही मंगळवारपासून जोरदार वार्यासह मुसळधार पाऊस झाला. कळंबोली परिसरात काही झाडे कोसळली. परंतु आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने तेथील परिस्थितीची पाहणी करून सिडको आणि महापालिका प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. नैसर्गिक आपत्ती टाळता येत नसली तरी सुयोग्य सावधगिरी बाळगल्यास व दूरदृष्टीने सज्जता ठेवल्यास जीवित व मालमत्तेची हानी टाळता येऊ शकते.