Breaking News

उरणमध्ये आढळताहेत अजगर

उरण : प्रतिनिधी

उरण परिसरात ठिकठिकाणच्या नागरी वस्त्यांमध्ये याआधी क्वचितच आढळून येणारे भले मोठे अजगर मोठ्या संख्येने दिसु लागले आहेत. यामध्ये सर्वत्रच आढळून येणार्‍या इंडियन रॉक पायथॉन जातीच्या अजगरांची संख्या सर्वाधिक आहे. मागील दोन महिन्यांत तर भक्ष्यासाठी उरण परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये आलेल्या सुमारे 45 ते 50 अजगर सर्पमित्रांनी पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक आवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले आहेत.

उरण परिसरात औद्योगिक विकासासाठी वनसंपदा नष्ट झाली आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे नैसर्गिक हिरवळही सिमेंट कॉक्रीटच्या वाढत्या जंगलात हरवुन गेली आहे. परिणामी वन्यजीवांची आश्रयस्थाने नष्ट झाली आहेत. वन्य जमीनींवर मानवांचे अतिक्रमणही वाढले आहे. मानवांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे जंगलातील वन्यजीवांनी भक्षांसाठी आता आपला मोर्चा नागरी वस्त्यांमध्ये वळवला आहे. याआधी नागरी वस्त्यांमध्ये पक्षी आणि विविध प्रकारचे साप आणि अन्य सरपटणारे मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. त्यामध्ये आता भल्यामोठ्या अजगरांची भर पडली आहे.

याआधी सदानकदा जंगलातच आढळून येणारे अजगर आता भक्ष्यांच्या शोधार्थ नागरी वस्त्यांमध्ये येताना आढळून येऊ लागले आहेत. मागील दोन महिन्यात उरण परिसरातील विविध ठिकाणाहून सुमारे 45 ते 50 अजगर सापडले आहेत. यामध्ये चार ते 14 फुट लहान मोठ्या आकार आणि लांबीच्या अजगरांचा समावेश आहे. 5 ते 25 किलो वजनाचे अजगर बकर्‍या, कुत्री, मांजरे, उंदीर, कोंबड्या खाण्यासाठी नागरी वस्त्यांमध्ये येतात.असे अजगर कधी कोंबड्यांच्या खुराड्यात कधी बकर्‍यांच्या गोठ्यात सापडताना दिसतात. काही वेळा तर परिसरात यांत्रिक दगदगीच्या ठिकाणी असलेल्या कंटेनर मालाच्या गोदामात ही भले मोठे अजगर आढळून आले आहेत. यामध्ये सर्वत्रच आढळून येणार्‍या इंडियन रॉक पायथॉन जातीच्या अजगरांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या डोंगर, जंगल परिसरात यांत्रिक आवाजाची धडधड वाढली आहे. त्यातच जंगलात भक्ष्याची चणचण भासत आहे.त्यामुळेच भक्षांच्या शोधार्थ नागरी वस्त्यांमध्ये येणार्‍या अजगरांची संख्या वाढत चालली आहे. मागील दोन महिन्यात मानवी वस्तीत आलेल्या 16 बेबी पायथॉन तर नऊ मोठे अजगर पकडून जंगलात सोडून दिले आहेत, असे उरण येथील सर्पतित्र आनंद मढवी यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply