Breaking News

रायगडच्या विकासासाठी पंचसूत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सुपूर्द

पनवेल ः प्रतिनिधी
औद्योगिक विकासापासून वंचित राहिलेल्या दक्षिण रायगडमधील श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यांसह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड व दापोली तालुक्यांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याबाबत होऊ शकणार्‍या उपाययोजनांची विकासाची पंचसूत्री केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय मंत्री नितीन गडकरी यांना ग्रंथमित्र, तथा भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा चिटणीस मनोज गोगटे यांनी नागपूर येथील जनता दरबारात सुपूर्द केली.
पूर्वीचा कुलाबा व सध्याच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा विभाग आजही विकासापासून वंचित राहिला आहे. जिल्ह्यात इतरत्र झालेल्या औद्योगिक विकासाचा कोणताही लाभ या तालुक्यातील नागरिकांना मिळाला नाही. परंपरागत चालत आलेले शेती, मासेमारी व बागायत यातून मिळणार्‍या उत्पन्नावर अनेकांची उपजीविका सुरू आहे. 2014पासून पर्यटन वाढीसाठी सुरू असलेल्या सरकारी नियोजनामुळे उत्पन्नाचे उपलब्ध झालेले पर्याय तोकडे पडत असल्याने कायमस्वरूपी उपयोगी ठरू शकतील असे उपाय या पंचसुत्रीत शासनाकडे सूचवण्यात आले आहेत.

अशी आहे पंचसुत्री ः

1. औद्योगिक मागासलेपण दूर करण्यासाठी अभियांत्रिकी, हरित ऊर्जा, जहाजबांधणी यापैकी किमान एक प्रकल्प श्रीवर्धन, म्हसळा अथवा मंडणगड दापोली येथे सुरू करावा.
2. दिघी येथील औद्योगिक बंदर उर्वरित महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात जोडले जाण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्थावित असलेल्या शिरवळ-महाड-दिघी पोर्ट मार्ग व राज्य शासनाने सादर केलेल्या दिघी पोर्ट ते जेएनपीए ग्रीन फील्ड मार्गास तातडीने मंजुरी देऊन फलटण ते दिघी पोर्ट महामार्गाचे काम सुरू करावे.
3. कार्यालयीन वेळेत वीर (महाड) ते पनवेल मार्गावर मेमू ट्रेन सुरू करण्यात यावी. या ट्रेनचा उपयोग दैनंदिन कामासाठी प्रवास करणार्‍या अनेक नागरिकांना होईल.
4. तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर ते रोहा या मागार्वर रेल्वे सुरू झाल्यास दिघी पोर्टमधील मालवाहतूक सुलभ होईल, तसेच पर्यटनवाढीला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल.
5. लघुउद्योगांना चालना देण्याकरिता उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्री, शासकीय कर्ज योजना आदींबाबत प्रदर्शन आयोजित करावे.

विविध क्षेत्रातील प्रकल्प श्रीवर्धन, म्हसळा परिसरात सुरू झाल्यास तालुक्यातील नागरिकांचे शहराकडे होणारे स्थलांतर कमी होऊन तालुक्यातील नागरिकांचे एकूण राहणीमान सुधारण्यासोबतच स्वयंपूर्णता येईल तसेच निव्वळ पर्यटनावर असलेले अवलंबित्व निश्चित कमी होईल.
-मनोज गोगटे, भाजप दक्षिण रायगड जिल्हा चिटणीस

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply