Breaking News

मंदिरे खुली करण्यासाठी आज घंटानाद आंदोलन

पनवेल : कोरोना काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ’मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्यातील मांस, मदिरा सर्वकाही सुरू केले, मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ’हरी’ला बंदिस्त करून ठेवले आहे. सर्व धार्मिक स्थळे व मंदिरे तत्काळ खुली करण्यात यावी, या मागणीसाठी देवस्थान व धार्मिक संस्थांच्या वतीने शनिवारी (दि. 29) ’दार उघड उद्धवा दार उघड’ घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात आध्यात्मिक आघाडी, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.  
महाविकास आघाडी सरकार हे भजन, पूजन करणार्‍या भाविक-भक्तांवर गुन्हे दाखल करीत आहे. ’भाविक-भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल’ असा ठाकरे सरकारचा कारभार सुरू आहे. केंद्र सरकारने 4 जून 2020 रोजी या संदर्भात परिपत्रक जारी केले असून, त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू केलेलीसुद्धा आहेत. राज्यातही सामाजिक अंतर राखून आवश्यक नियम, अटी, शर्तींसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक-भक्तांकडून होत आहे, मात्र पुनश्च ’हरिओम’ म्हणून हरीला बंदिस्त करून ठाकरे सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले आहे.
राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन, कीर्तन व भजनाला परवानगी मिळावी या मागणीकडे निद्रस्त ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील संत-महंत, आचार्य, धर्माचार्य, धार्मिक, आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी तसेच देवस्थान, तीर्थक्षेत्र येथील उदरनिर्वाह निगडित असलेले व्यावसायिक शनिवारी सकाळी 11 वाजता जिल्ह्यात सर्वत्र देवस्थाने, मंदिरे, धार्मिक स्थळांसमोर घंटानाद आंदोलन सामाजिक अंतरांचे पालन करून करणार आहे. या घंटानाद आंदोलनात आध्यात्मिक आघाडी, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply