Breaking News

कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांचा इशारा

पनवेल : रामप्रहर वृत्त                                      

कोविडचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने कोरोनासंबंधीच्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी केले आहे, तसेच या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वत:सह कुटुंबीयांची काळजी घेऊन सतर्क राहावे. यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नियमांचे पालन करावे. यामध्ये लग्न समारंभाची मंगल कार्यालये, हळदी समारंभ, साखरपुडा, जिमखाना-क्लब, नाइट क्लब, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, सर्वधर्मीय स्थळे, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल्स तसेच सर्व खासगी कार्यालये अशा सर्वच ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक आहे. मास्कचा वापरला नसल्याचे आढळल्यास आणि 50पेक्षा अधिक व्यक्ती एकावेळी आढळल्यास संबंधित व्यक्तींना दंड करण्यासोबत त्या त्या ठिकाणच्या आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी स्पष्ट केले. 

लग्नसोहळ्याचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी करून तिथे कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले असेल, तर दंडात्मक कारवाई करून लग्नाचे आयोजक-पालक तसेच संबंधित व्यवस्थापनांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात येतील. मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे आणि सतत हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर करून नागरिकांनी कोरोनाला स्वत:सह कुटुंबीयांपासून दूर ठेवावे, असेही आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौंडकर यांनी केले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply