थिरिमनेसोबत श्रीलंकेचा डाव सावरला
लंडन : वृत्तसंस्था
भारताविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेने 50 षटकांत 7 बाद 264 धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली होती, पण अनुभवी अँजेलो मॅथ्यूजचे शतक (113) आणि थिरिमनेचे अर्धशतक (53) याच्या जोरावर श्रीलंकेने अडीचशे धावांचा टप्पा गाठला.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा पर्याय स्वीकारला, मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. करुणरत्ने बाद झाल्यावर लगेचच कुशल परेरा 18 धावांवर माघारी गेला. त्यानंतर कुशल मेंडिसदेखील केवळ तीन धावा करून माघारी परतला. रवींद्र जडेजाने पहिल्याच षटकात त्याचा अडसर दूर केला, तर पुढील षटकात पांड्याने अविष्का फर्नांडोला झेलबाद केले.
अँजेलो मॅथ्यूज आणि थिरिमने या दोघांनी डाव सावरला. या दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण केली, पण त्यानंतर थिरिमने माघारी परतला. त्याने 68 चेंडूंत 53 धावा केल्या. दुसरीकडे मॅथ्यूजने एक बाजू लावून धरली. अनुभवी अँजेलो मॅथ्यूज हा शतक ठोकून बाद झाला. त्याने केलेल्या खेळीमुळे श्रीलंकेला अडीचशेपर्यंत मजल मारता आली. मॅथ्यूजने 128 चेंडूंत 10 चौकार आणि दोन षटकार लगावत 113 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने तीन, तर पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
भारतीय संघाने या सामन्यासाठी दोन बदल केले होते. चहल आणि शमी यांना विश्रांती देऊन कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाला संघात संधी देण्यात आली.