Breaking News

सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचा आरोप

प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने वागावे ः सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : सुप्रीम कोर्टातील एका कनिष्ठ महिला कर्मचार्‍याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला असून या आरोपांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी उत्तर दिले आहे. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असून महिलेच्या मागे काही शक्तिशाली लोकांचा हात असावा, असे त्यांनी म्हटले आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी माझा लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. यासंदर्भात एक सविस्तर पत्रच या महिलेने सर्वोच्च न्यायालयाच्या 22 न्यायाधीशांना लिहिले आहे. यामुळे इतिहासात पहिल्यांदाच सरन्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष सुनावणी बोलावण्यात आली आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी एका 35 वर्षांच्या महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केल्याचे वृत्त स्क्रोल, लिफलेट आणि कारावान या न्यूज पोर्टल्सनी शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. या वृत्तानुसार पीडित महिला सर्वोच्च न्यायालयातील एक सामान्य कर्मचारी होती. 10 आणि 11 ऑक्टोबर 2018ला रंजन गोगोईंनी तिचा शारीरिक छळ केला होता.

गोगोई यांच्या गैरवर्तनाला विरोध केल्यामुळे पीडित महिलेला रंजन गोगोई यांच्या घरी दिलेल्या कामावरून काढून टाकण्यात आले. डिसेंबर 2018मध्ये तिला सर्वोच्च न्यायालयातील नोकरीवरूनही बडतर्फ करण्यात आले. त्यासाठी परवानगीशिवाय सुट्टी घेतल्याचे कारण देण्यात आले. या महिलेचा छळ इथेच थांबला नाही. दिल्ली पोलीसमध्ये कॉन्स्टेबल असलेल्या तिच्या पतीला आणि दिरालाही 28 डिसेंबर 2018ला बडतर्फ करण्यात आले.

11 जानेवारीला तिला सरन्यायाधीशांच्या घरी पाचारण करण्यात आले. गोगोई यांच्या पत्नीने जमिनीवर नाक घासून तिला माफी मागायला लावली. माफी का मागायला लावली हे मात्र त्यांनी सांगितले नाही, असे पीडित महिलेने आपल्या पत्रात म्हटले आहे, पण अशी माफी मागूनसुद्धा 14 जानेवारीला कोणतेही कारण न देता तिच्या अपंग दिराला सर्वोच्च न्यायालयातून नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

9 मार्च 2019ला राजस्थानमधील मूळ गावी आपल्या कुटुंबासोबत ही महिला गेली असता तिथे दिल्ली पोलिसांची धाड पडली. सर्वोच्च न्यायालयात नोकरी देते, असे म्हणत एका इसमाला 50,000 रुपयांचा गंडा घातल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला. या प्रकरणी पीडित महिला, तिचा पती, दीर, त्याची पत्नी या सगळ्यांनाच ताब्यात घेण्यात आले. दिल्लीतील तिलक मार्ग पोलीस स्थानकात या सर्वांना डांबून ठेवण्यात आले. येथे पोलिसांनी त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली, असा आरोपही या महिलेने आपल्या पत्रात केला आहे. 24 तास या सर्वांना अन्न-पाणीही देण्यात आले नाही. पोलिसांनी केलेल्या छळाचे व्हिडीओ फुटेजसुद्धा या महिलेने पत्रासोबत पाठवले आहे. या फुटेजमध्ये ही महिला आणि तिच्या पतीचे पोलिसांनी हात बांधले असल्याचे दृश्य दिसत आहे. सरन्यायाधीशांच्या सचिवांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

सुप्रीम कोर्टात ज्युनियर कोर्ट असिस्टंट म्हणून काम करणार्‍या 35 वर्षीय महिलेने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. सध्या संबंधित महिला सुप्रीम कोर्टात कार्यरत नाही. महिलेने सुप्रीम कोर्टात यासंदर्भात तक्रार दिली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अरुण मिश्रा आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर या तक्रारीची तातडीने सुनावणी झाली.

 सरन्यायाधीश म्हणाले की, 20 वर्षे न्यायपालिकेत नि:स्वार्थ सेवा केल्यानंतर माझ्या बँकेत 6 लाख 80 हजार रुपये जमा आहे. पीएफ खात्यात 40 लाख रुपये आहेत. काही शक्तींना माझ्याविरोधात काहीच मिळत नसल्याने त्यांनी आता एका महिलेचा आधार घेत माझ्यावर आरोप केले आहेत. या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी निर्णय देणे टाळले, तर अन्य न्या. मिश्रा आणि न्या. खन्ना यांनी माध्यमांनी जबाबदारीने वागावे, असे सांगितले. सत्यतेची पडताळणी केल्याशिवाय माध्यमांनी महिलेच्या आरोपांना प्रसिद्धी देऊ नये, असेही त्यांनी नमूद केले.प्रसारमाध्यमांनी महिलेच्या आरोपांना प्रसिद्धी देताना संयम बाळगावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. महिलेच्या आरोपांची शहानिशा न करता बातम्या देण्यामुळे न्याययंत्रणेचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते, अशी भीतीही न्यायालयाने व्यक्त केली आहे.

सरन्यायाधीशांनी सांगितले, लैंगिक छळाचे आरोप करणारी महिलाच चार दिवस तुरुंगात होती व तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, तसेच तिला पोलिसांनीही तंबी दिली होती. देशाच्या न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असून काही शक्तींचा या महिलेला पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला. सुप्रीम कोर्टाचे महासचिव संजीव कलगावकर यांनी सांगितले, या महिलेने केलेले सर्व आरोप बदनामी करणारे व बिनबुडाचे आहेत. यावर सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीशांवर आरोप करणारे पत्र या महिलेने अनेक न्यायाधीशांना पाठवल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply