कर्जत ः बातमीदार
रायगड जिल्ह्यातील कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने या वर्षीच्या उत्कृष्ट तपासकार्याबद्दल पदक जाहीर केले आहे. महाराष्ट्रातून केवळ 10 अधिकार्यांची केंद्रीय स्तरावरील पदकासाठी निवड झाली असून संपूर्ण देशातून 121 अधिकार्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने निवडले आहे.
पोलीस दलात अधिकारीपदावर रुजू होण्याआधी अनिल घेरडीकर यांनी भारतीय लष्कराच्या सीआयपीएफमध्ये डेप्युटी कमांडो पदावर सात वर्षे सेवा बजावली. यानंतर महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपअधीक्षकपदी 2016मध्ये घेरडीकर रुजू झाले. सांगोला तालुक्यातील घेरडी गावचे सुपुत्र अनिल घेरडीकर यांनी आपल्या गावाचा अभिमान म्हणून आपले आडनाव घेरडीकर करून घेतले. सध्या रायगड पोलीस दलात उपविभागीय पोलीस अधिकारीपदी कार्यरत अनिल घेरडीकर यांना 2016 ते 2019 या काळात परभणीतील जिंतूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना एका गुन्ह्यात केलेल्या तपासकामाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाने सन्मानित केले आहे. जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस स्टेशन हद्दीत एका नराधमाने अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले होते. या घटनेने ग्रामस्थांत संतापाची लाट उमटली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक असलेले अनिल घेरडीकर यांच्याकडे होता. अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेचे कोणीही साक्षीदार नसताना घेरडीकर आणि त्यांच्या पथकाने घटनेतील नराधमांना ताब्यात घेतले. घेरडीकर यांनी न्यायालयात सादर केलेल्या मजबूत पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अनिल घेरडीकर यांच्या कामगिरीची नोंद घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना उत्कृष्ट तपास पदक जाहीर केले आहे.