पोलादपूर ः प्रतिनिधी
श्रावण महिन्याच्या व्रत आणि उपवासकाळात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील रानभाज्यांची आवक शहरी भागात होते. त्या पार्श्वभूमीवर महाड उपविभागीय कृषी अधिकारी साळवे यांनी महाड आणि पोलादपूर शहरांमध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (दि. 14) सकाळी 9 वाजता पोलादपूर एसटी बसस्थानक आणि महाड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी भाजीपाल्याची रोपे व बियाणांची शेतकर्यांना अल्पदरात विक्री करण्यात येणार असून ग्रामीण भागातील शेतकरी रानभाज्या विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. महाड व पोलादपूरवासीयांनी या रानभाजी महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन महाड व पोलादपूर तालुका कृषी कार्यालयांतर्फे करण्यात आले आहे.