खांदेश्वर पोलिसांची धडक कारवाई
पनवेल : बातमीदार, वार्ताहर
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरी आणि लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याचे प्रकार घडले होते. पोलिसांनी यातील तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुकापुर येथील गावदेवी मंदिरातील दानपेटी आणि विहिघर येथील पंढरीनाथ फडके यांच्या बंगल्यातील साईबाबा मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्या होत्या. मंदिरातील दान पेटी चोरीला गेल्याचा गुन्हा खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. के. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव कुमार रोंगे आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाद्वारे पंचशील नगर झोपडपट्टी सेक्टर 17, नवीन पनवेल येथून संतोष साहेबराव चव्हाण उर्फ गोल्या (वय 26), सुरज मारुती देवरे उर्फ वाकड्या वय (20) आणि आकाश गोपाळ गाडे उर्फ आक्या (20, विचुंबे) या तिघांना अटक केली.
त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या 85 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या तिघांना अटक करण्यात आल्याने खांदेश्वर पोलीस ठाण्यातील चार गुन्हे आणि पनवेल शहर पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल करण्यात खांदेश्वर पोलिसांना यश आले आहे.