नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक शनिवारी (दि. 25) सकाळी पार पडली. या बैठकीस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित होते. बैठकीत राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला, मात्र समितीमधील नेत्यांनी एकमताने राहुल गांधी यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. कार्यकारिणीने पक्षात बदल करण्याचे सर्वाधिकार राहुल गांधींनाच दिले असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे प्रवक्ते सुरजेवाला यांनी बैठकीनंतर सांगितले.
लोकसभा निवडणुकीत 542पैकी काँग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडमधून दणदणीत विजय मिळवला असला तरी परंपरागत अमेठी मतदारसंघ त्यांना राखता आला नाही.