Breaking News

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाकडून भारताचा दुहेरी बहुमान, सर्वोत्तम संघांचे विराट, धोनीकडे कर्णधारपद

सिडनी : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने दशकातील सर्वोत्तम कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संघांचे कर्णधारपद भारतीय खेळाडूंकडे देण्यात आले आहे. कसोटी संघासाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, तर एकदिवसीय संघासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला कप्तान करण्यात आले आहे.

ज्यांनी गेल्या 10 वर्षांत सर्वोत्तम कामगिरी केली या खेळाडूंसह ज्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे त्यांचाही ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने दशकातील सर्वोत्तम संघात समावेश आहे. कसोटी संघात सर्वांत जास्त खेळाडू इंग्लंडचे आहेत. या संघाचे नेतृत्व भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला देण्यात आले आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून संघाला अनेक मोठे विजय मिळवू दिले आहेत. याशिवाय एक फलंदाज म्हणूनदेखील विराटची कसोटीमधील कामगिरी शानदार असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या बोर्डाने म्हटले आहे. विराट कोहली वगळता अन्य एकाही भारतीय खेळाडूला या संघात स्थान नाही.

भारतीय क्रिकेटसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातही आपला ठसा उमटवणार्‍या महेंद्रसिंह धोनी याची क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून जाहीर करण्यात आलेल्या या दशकातील एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. या संघात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

महेंद्रसिंह धोनीव्यतिरिक्त विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही या एकदिवसीय क्रिकेट संघात स्थान मिळाले आहे. ’दहा वर्षांमधील नंतरचा काही काळ त्याच्या फलंदाजीची फारशी जादू पाहता आली नसली तरीही भारतीय क्रिकेटमधील सुवर्णकाळामध्ये त्यातही एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचा विशेष अफलातून अंदाज पाहाला मिळाला. 2011मध्ये मायदेशी झालेल्या विश्वचषक सामन्यांमधील त्याचे योगदान पाहता फलंदाजीच्या बाबतीत तो भारतीय संघासाठी सामना निकाली काढणाराच खेळाडू ठरला’, असे धोनीची प्रशंसा करत क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून नमूद करण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून फक्त धोनीच्या फलंदाजीचीच नव्हे, तर त्याच्या यष्टीरक्षणाचीही प्रशंसा करण्यात आलीय.

‘विस्डन’च्या संघात दोन भारतीय

प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या ‘विस्डन’च्या दशकातील सर्वोत्तम 11 कसोटीपटूंच्या यादीत केवळ दोन भारतीय खेळाडूंचा (विराट कोहली व रविचंद्रन अश्विन) समावेश करण्यात आला आहे. 11 खेळाडूंच्या या यादीत सर्वाधिक म्हणजेच प्रत्येकी तीन खेळाडू हे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे आहेत. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत यांचे प्रत्येकी दोन खेळाडू आहेत, तर श्रीलंकेच्या केवळ एका खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे.

असा आहे वन डे संघ : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, हाशिम आमला, विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, शाकिब अल हसन, जॉस बटलर, मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, लसिथ मलिंगा, राशिद खान. असा आहे कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अ‍ॅलेक्टर कुक, डेव्हिड वॉर्नर, केन व्हिल्यमसन, स्टीव्ह स्मिथ, एबी डिव्हिलियर्स, बेन स्ट्रोक्स, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अ‍ॅडरसन आणि नाथन लयोन.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply