पनवेल : बातमीदार
गणेशोत्सव म्हटला की, विघ्नहर्त्यांला हार-फुले ही लागणारच. मात्र यंदा प्रथमच हार, फुले महाग झाली आहेत. फुलांचे दर दुप्पट झाले आहेत. यामुळे भक्तांच्या खिशाला यंदा हार, फुलांसाठी मोठी कात्री बसत आहे. मागील वर्षीपेक्षा दर दुप्पट झाले आहेत.
कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता शेतकर्यांनी यावर्षी फुलशेती करताना आखडता हात घेतला आहे. परिणामी गौरी-गणपतीसाठी मागणी असतानाही बाजारात फुलांचा तुटवडा आहे. यावर्षी अवघी 30 टक्केच फुलांची लागवड केल्याचे काही फूल उत्पादकांनी सांगितले.
श्री गणरायाला प्रिय असलेले जास्वंदाचे एक फूल 10 ते 15 रुपयांना विकले जात आहे. जास्वंदाच्या 100 फुलांसाठी 700ते 800 रुपये मोजावे लागत असल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. एरव्ही 200 ते 250 रुपयांत जास्वंदीच्या 100 कळ्या म्हणजे फुले मिळत होती. गुलाब, शेवंती आणि गोंडा फुलांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे 20 ते 50 रुपयांना असणारे हार आता 100 ते 150 रुपयांना विकले जात आहेत. तर गुलाब पाकळी असलेले हार दरवर्षी 150 ते 200 रुपयांना होते ते वाशी येथे 500 ते 600 रुपयांना आहेत. चाफ्याच्या एका फुलाची किंमत 10 ते 15 रुपये आहे.
बाजारात तुटवडा
गुढीपाडव्यानंतर मराठी सण, उत्सवांना सुरुवात होते. मात्र या वर्षी पाडव्यापासूनच कोरोना संकट सुरू झाले आहे. टाळेबंदीत सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे बंद आहेत. या काळात फुलांना मागणी पूर्णत: नव्हती. त्यामुळे नुकसान होईल या भीतीपोटी फूल उत्पादकांनी फुलांची लागवड करण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे यंदा अवघी 30 टक्के लागवड झाली आहे. त्यामुळे फुलांचा तुटवडा आहे.
पाडव्याला फुलांना मागणी नव्हती. त्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाले होते. त्यामुळे पुढील काळात काय परिस्थिती असेल याचा अंदाज नसल्याने कमी लागवड केली आहे.
– जगन्नाथ काकोडे, फूल बागायतदार, पुणे