Breaking News

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे सरकारला अल्टीमेटम

कोल्हापूर ः प्रतिनिधी

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सोमवारच्या आत वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही. संपूर्ण राज्यभर आंदोलनाचे रान उठवू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्या पतीवरील गुन्हा, मराठा आरक्षण यावरून सरकारवर टीका केली.

मुख्यमंत्री सत्यवादी आहेत म्हणून तर आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, पण उद्धव ठाकरे यांना केवळ आपल्या खुर्चीची काळजी आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. महाविकास आघाडीतील सहा मंत्र्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असतानाही त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचे पडसाद विधिमंडळ सभागृहाच्या कामकाजात अधिक उमटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत बोलताना चंद्रकांत आमदार पाटील म्हणाले, संजय राठोड यांच्यावर कारवाई का केली जात नाही? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्वतःला सत्यवादी समजणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार याप्रकरणी गप्प का बसले आहेत? तसेच, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे विधानपरिषदेचे उपसभापती, शिवसेना नेत्या नीलम गोर्हे यांनी बोलले पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

याचबरोबर, आगामी अधिवेशनात शेतकर्‍यांची कर्जमाफी, प्रामाणिक शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदान, वीज बिल माफी, करोना महामारी काळातील वैद्यकीय साहित्य खरेदीतील प्रचंड भ्रष्टाचार, मराठा समाज आरक्षण आदी प्रश्न आक्रमकपणे मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दडपशाहीचा कारभार खपून घेणार नाही

संजय राठोड प्रकरणी भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ या वाघिणी प्रमाणे आक्रमक झाल्या असताना, त्यांच्या पतीवर गुन्हे दाखल करण्याचे काम राज्यशासन करत आहे. हा दडपशाहीचा कारभार भाजप खपून घेणार नाही, असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply