
जगभरातील सर्वच देशांचे लक्ष सध्या कोरोना विषाणूवरील लसीच्या उत्पादनाकडे लागले असून सर्वांना परवडणारी आणि दीर्घ काळ प्रभावी लस विकसित करण्यासाठी देशोदेशीचे शास्त्रज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. गुरूवारी जगभरातील आजवरच्या कोरोना रुग्णांची संख्या दोन कोटी 40 लाखांवर गेली. जगभरात एव्हाना या विषाणूमुळे आठ लाख 22 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. अमेरिकेत सर्वाधिक 59 लाख कोरोना केसेसची नोंद झाली आहे तर त्यापाठोपाठ ब्राझीलमध्ये 37 लाख व भारतात सुमारे 33 लाख केसेस नोंदल्या गेल्या आहेत.
कोरोना विषाणूवरील ज्या लसीकडे सर्वाधिक आशेने पाहिले जाते आहे त्या ऑक्सफर्ड कोविड व्हॅक्सिनच्या भारतातील मानवी चाचण्या सुरू झाल्या आहेत. बुधवारी पुणे येथील भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दोघा स्वयंसेवकांना चाचणीचा भाग म्हणून ही लस टोचण्यात आली. या दोघांमध्येही आरोग्यविषयक सर्व महत्त्वाच्या बाबी नॉर्मल असल्याचे गुरूवारी डॉक्टरांकडून सांगण्यात आले. येत्या आठवडाभरात आणखी 24 जणांना ही लस टोचली जाणार आहे. पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोविशील्ड नावाची ही लस तयार केली जाते आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लस-उत्पादक असून यात सिरम इन्स्टिट्यूटचा वाटा सर्वात मोठा आहे. सध्या सुरू असलेल्या चाचणीच्या दुसर्या टप्प्यात देशभरात निरनिराळ्या ठिकाणी सुमारे 100 जणांना ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर देशभरात 1500 जणांना ही लस दिली जाईल. जगभरात या लसीच्या तिसर्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. सध्या सरकारने लसीचे उत्पादन करून भविष्यातील वापरासाठी साठा निर्माण करण्याची परवानगी दिली आहे. डिसेंबरपर्यंत ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे. दरम्यान रशियाच्या विवादास्पद लसीच्या उत्पादनासंदर्भात बोलणी करण्यासही देशातील झायडस कॅडिला या कंपनीने तयारी दर्शवली आहे. जगभरातील 60 टक्के लस-उत्पादन भारतात होत असल्यामुळे स्वाभाविकपणे रशियाकडून यासंदर्भात भारताशी संपर्क साधला गेला. परंतु रशियन लसीच्या बाबतीत सुस्पष्टता नसल्याने बोलणी अद्याप पुढे जाऊ शकलेली नाहीत. औषध नियंत्रकांकडून हिरवा सिग्नल मिळाल्यास उत्पादन करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी नाहीत असे झायडस कॅडिला कंपनीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान लसीच्या उत्पादनावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प वादात अडकले असून अध्यक्षीय निवडणुकीवर डोळा ठेवून ते पुरेशा चाचण्या न करताच लस बाजारात आणण्याची घाई करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो आहे. तर अमेरिकेचे अन्न आणि औषध प्रशासन लसीच्या चाचण्यांसाठी उमेदवार मिळणे कठीण करीत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. कोणतीही लस सुरक्षित असल्याची पुरती खातरजमा न केल्यास ते अन्य लसींसाठीही धोक्याचे ठरेल असा इशारा अमेरिकेतील लस-तज्ज्ञांनीही दिला आहे. लसनिर्मितीत आपले घोडे दामटण्यात चीनही मागे नाही. चीनमध्ये विकसित लसीच्या मानवी चाचण्या संयुक्त अरब अमिरातींमध्ये सुरू आहेत. तर खुद्द चीनमध्येही सरकारने विशेषाधिकार वापरून मानवी चाचण्या सुरू केल्या असल्याचे समजते. दरम्यान आपल्या देशातील कोविड-19मधून बरे झालेल्यांची संख्या 25 लाखांच्यावर गेल्याचे गुरूवारी केंद्रीय आरोग्य खात्याने जाहीर केले. कोरोना रुग्णांमधील मृत्यूदर 1.83 टक्क्यांवर घसरला आहे तर देशभरातील कोरोना चाचण्यांची संख्या 3.9 कोटी इतकी झाली आहे.