Breaking News

नेरळमध्ये पर्यटक अडकले; स्थानिकांकडून सुटका

कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आंबेवाडी येथील धबधब्यावर वर्षासहलीसाठी आलेले पर्यटक अडकले होते. त्यांना स्थानिक तरुणांनी सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, पाणावठ्याच्या ठिकाणी येण्यास बंदी असताना पर्यटक धबधब्यापर्यंत पोहोचतातच कसे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
कल्याण आणि अंबरनाथ येथील आठ पर्यटक शुक्रवारी (दि. 28) नेरळ पोलिसांची नजर चुकवून आंबेवाडी येथे असलेल्या धबधब्यावर वर्षासहलीसाठी आले होते. दुपारपर्यंत उघडीप दिलेल्या पावसाने नंतर जोरदार बरसात केली. साधारण पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धबधब्यातील पाणी ज्या नाल्यातून नेरळ गावाकडे येते त्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. परिणामी घरी जाण्याची तयारी करणारे ते आठ तरुण अडकून पडले. हा धबधबा आंबेवाडी आणि नवीन आंबेवाडी या वाड्यांच्या लोकवस्तीपासून जंगलात लांब अंतरावर आहे. त्यामुळे त्या तरुणांबद्दल कोणालाही माहिती नव्हते.
आंबेवाडीतील काही जण गणेशोत्सवासाठी पायरमाळ येथे आले होते. पावसाचा जोर कमी झाल्याने या सर्वांनी घरचा रस्ता धरला. त्या वेळी नाल्यावर त्यांना आठ तरुणांनी मदतीसाठी हाका मारल्या. तेथे जाऊन आंबेवाडीतील तरुणांनी वाडीमधून आणखी काहींना मदतीसाठी बोलावले. मग 15 आदिवासी तरुणांच्या गटाने धबधब्याच्या नाल्याजवळ अडकलेल्या आठ जणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. आदिवासींनी हाताचे कडे करीत नाल्यात उतरून एका एका पर्यटकाला बाहेर काढले. साधारण साडेसहा वाजता सर्व आठ तरुणांना बाहेर काढण्यात आदिवासींना यश आले.
धरणे, धबधब्यांवर यायला जमावबंदी आदेश लागू असल्याने हा आदेश मोडला म्हणून सर्व पर्यटकांना पोलीस ठाण्यात नेण्याची सूचना ज्येष्ठ ग्रामस्थांनी केली, पण अशी चूक पुन्हा होणार नाही आणि आमचे घरचे लोक आमची वाट पाहत आहेत, अशी विनवणी ते तरुण करू लागल्याने शेवटी सर्वांना समज देऊन सोडण्यात आले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply