महावितरण कंपनीचा ग्राहकांना ‘शॉक’
अलिबाग : प्रतिनिधी
महावितरण कंपनीने पाच महिन्यांचे वीज बिल एकत्रित पाठवून ग्राहकांना ‘शॉक’ दिला आहे. भरमसाठ बिले आल्याने महावितरणच्या कार्यालयाबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. शंकेचे निरसन होत नसल्यामुळे महावितरण कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वादही होत आहेत.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर शासनाने मार्च महिन्यापासून टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. अनेकांना घरी बसावे लागल्याने आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले आहे. कोरोना प्रादुर्भाव असल्याने महावितरण कंपनीने ग्राहकांच्या वीज बिलासाठी मीटर रीडिंग घेतले नाही. त्यामुळे नागरिकांना बिले घरी पाठविले गेली नाही, तर महावितरणकडून ऑनलाइन अंदाजित बिले ग्राहकांना पाठविण्यात आली. त्यामुळे ही वीज बिले कमी दराची आली, मात्र त्यानंतर महावितरणने एप्रिल ते ऑगस्ट अशी पाच महिन्यांची भरमसाठ बिले ग्राहकांना पाठवली आहेत.
पाच महिन्यांचे एकत्रित बिल आल्यामुळे अनेकांना ते भरणे शक्य नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. भरमसाठ आलेली वीज बिले पाहून ग्राहकांना शॉकच बसला आहे. ग्राहक महावितरण कार्यालयात जाऊन संताप व्यक्त करीत आहेत.
ऑगस्ट महिन्यात रीडिंग घेऊन एप्रिल ते ऑगस्ट अशी पाच महिन्यांची बिले ग्राहकांना दिली आहेत. ज्या ग्राहकांना वीज बिले एकदम भरता येत नसतील त्यांना ती तीन टप्प्यांत भरण्याची मुभा महावितरणकडून देण्यात आली आहे.
-डी. बी. चिपरीकर, सहाय्यक अतिरिक्त अभियंता, अलिबाग महावितरण