मुंबई : प्रतिनिधी
अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राज्य शासन नमले असून, परीक्षा घेण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील. परीक्षा शक्यतो ऑनलाईन घेण्याचा विचार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (दि. 31) येथे पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बुधवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावली जाईल. त्यानंतर कुलगुरूंनी केलेल्या विनंतीप्रमाणे 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळावी यासाठी यूजीसीकडे विनंती करणार आहोत, असेही या वेळी सामंत यांनी सांगितले.
सामंत पुढे म्हणाले की, पूर्ण सप्टेंबर महिना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिला जाईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल. निकाल काही विद्यापीठ 31 ऑक्टोबरपर्यंत, तर काही विद्यापीठ 10 नोव्हेंबरपर्यंत जाहीर करतील.
विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून केंद्रावर परीक्षा द्यावी लागणार नाही यासंबंधी कुलगुरूंकडे विनंती करण्यात आली असून, त्यावरही चर्चा झाली आहे. विद्यार्थ्यांना शारिरीक आणि मानसिक त्रास होणार नाही याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे अशी पुन्हा विनंती करण्यात आली. कुलगुरू आणि पेडणेकर समितीच्या लोकांनी बैठक आणि चर्चेसाठी अजून एक दिवस देण्याची विनंती केली आहे. परीक्षा कशी पद्धतीने घ्याव्या लागतील यासाठी बुधवारी दुपारी 4 वाजता
बैठक होणार आहे. त्यानंतर सरकारकडे दुसरा प्रस्ताव सादर केला जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …