गव्हाण ः वार्ताहर
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण शुक्रवारी (दि. 25) सुरू झाले. विद्यार्थी व पालकांचा या लसीकरण मोहिमेस भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अब्दुल करीम यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यसेविका ए. आर. तोंडलेकर व सी. एच. धुर्वे, आरोग्य सेवक एम. एल. जगताप व जे. एस. कदम यांच्या पथकाकडून लसीकरण सुरू झाले. विद्यालय पाचवी ते बारावीचे वर्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाले असल्यामुळे तसेच शासनाच्या सूचनेनुसार 12 ते 14 या वयोगटातील विद्यार्थ्यांचेही लसीकरण पूर्ण होण्यासाठी विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे प्रयत्नशील आहेत.
या वेळी रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर तसेच उपमुख्याध्यापक जगन्नाथराव जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके व क्रीडाशिक्षक जयराम ठाकूर आणि इतर वर्गशिक्षक उपस्थित होते.
लहान गटातील विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांची हजेरी लक्षणीय होती.