
पाली ः प्रतिनिधी
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ्या खुरकूत रोग नियंत्रणाकरिता लसीकरण मोहिमेस मंगळवारपासून (दि. 1) सुधागड तालुक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक जांभूळपाडा कार्यक्षेत्रातील टिपूदेवी देवीचंदजी संघवी गोशाळा येथे एकूण 165 जनावरांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणापूर्वी सर्व जनावरांच्या कानात 12 आकडी बिल्ले टोचण्यात आले. सदर जनावरांची नोंद केंद्र सरकारच्या इंफा या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. सुधागड तालुक्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून सहा महिन्यांच्या वरील सर्व गाय, म्हैस वर्ग यांचे लाळ्या खुरकूत या रोगप्रतिबंधक लसीचे लसीकरण करून घ्यावे तसेच जनावरांच्या कानात बिल्ले मारून घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, सुधागड-पाली यांनी या वेळी केले. सदर लसीकरण मोहिमेस पशुधन विकास अधिकारी जांभूळपाडा डॉ. प्रशांत कोकरे, पशुधन पर्यवेक्षक मोहन मोकल, परिचर सुनील कदम, विलास जाधव आदी उपस्थित होते.