माणगाव ः प्रतिनिधी
जागतिक कोरोना महामारीच्या संकटाला सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला असून या महामारीमुळे जारी लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील हिरे कामगारांना बसला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हिरे कारागीर बेरोजगार झाले असून बंद असलेल्या हिरे कारखान्यांमुळे या कामगारांची व कुटुंबांची मोठी आर्थिक परवड होत आहे.
कोरोना महामारीमुळे शहरातील हिरे कारखाने बंद झाले आहेत. या कारखान्यांतून काम करणारे कारागीर त्यामुळे बेरोजगार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक तरुण मुंबई, सुरत यांसारख्या शहरातून हिरे कारखान्यात हिर्यांना पैलू पाडण्याचे काम करतात. माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक तरुण हिरे कारखान्यात पैलू पाडण्याचे काम करतात. कोरोना महामारीत शहरातील कारखाने बंद झाले आहेत. याचा परिणाम या ठिकाणी काम करणार्या तरुणांच्या रोजीरोटीवर झाला आहे. लॉकडाऊन काळात कुटुंबासह मिळेल त्या साधनांनी गावाकडे आलेले हे कारागीर सहा महिने घरीच बसून आहेत. ना कोणते काम ना रोजगार त्यामुळे या कारागिरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कुटुंबाची परवड होत असून अजून किती काळ असे बेरोजगार राहायचे व कुटुंबाचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न या कारागिरांना पडला आहे. हिरे कारागीर हे बहुतांशी तरुण असून अनेक जण दहावी-बारावीपर्यंतच शिक्षण झालेे आहे. कायमस्वरूपी नोकरी नसल्याने अनेक जण जेवढे हिर्याचे काम तेवढा पगार अशा दैनंदिन स्वरूपात काम करतात. दिवसाला पाचशे ते सातशे रुपयांपर्यंत कारागीर काम करतात. यातील अनेकांची कुटुंब सोबतच शहरात असतात. त्यामुळे कुटुंबाचा खर्च भागविताना अनेकदा नाकीनऊ येतात. लॉकडाऊन काळात कुटुंब गावी आल्याने मुलांचे शालेय शिक्षण धोक्यात आले आहे. शहरातील शाळा ऑनलाइन शिक्षण देतात, मात्र गावी नेटवर्कची समस्या असल्याने मुले अभ्यासापासून वंचित राहत आहेत.