Breaking News

केंद्र सरकारचा गोरगरिबांना दिलासा

एक लाख 70 हजार कोटींचे पॅकेज जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना विषाणूमुळे हातावर पोट असणार्‍यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 26) एक लाख 70 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध दिलासादायक निर्णय जाहीर केले.
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर देश लॉकडाऊनमध्ये जात असल्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे संपूर्ण जनजीवन बंदिस्त झाले आहे. असंघटित आणि दररोज काम करून उदरनिर्वाह चालवणार्‍यांचा प्रश्न उपस्थित होत होता. त्यांच्यासह देशातील सर्वच घटकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधितांची काळजी घेणार्‍या सर्व वैद्यकीय कर्मचार्‍यांचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आभार मानले. अर्थमंत्री म्हणाल्या की, कोरोनाच्या लढाईत आघाडीवर लढणार्‍या वैद्यकीय कर्मचार्‍यांना 50 लाखांच्या विम्याचे कवच सरकार देणार आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, इतर वैद्यकीय कर्चार्‍यांचा समावेश आहे. याचा फायदा 20 लाख कर्मचार्‍यांना मिळणार आहे.
अन्नदाता अर्थात शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची तरतूद करण्यात येणार आहे. आठ कोटी 70 लाख शेतकर्‍यांच्या खात्यांवर दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. एप्रिल महिन्यात हे पैसे खात्यांवर जमा केले जातील. किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत हे पैसे जमा केले जाणार आहेत.
शेतकरी, मनरेगा कर्मचारी, विधवा, दिव्यांग ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे, असेही या वेळी सांंगण्यात आले.
तीन महिने गहू, तांदूळ, डाळ मिळणार मोफत
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरिबाला पुढील तीन महिने प्रत्येकी पाच किलो तांदूळ किंवा गहू मोफत दिले जाणार आहेत. त्यासोबतच एक किलो डाळ दिली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्याचा मोठा फटका गरीब, मजूर आणि इतर घटकांना बसणार आहे, मात्र केंद्र सरकारने या वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लाभार्थींना आधीच पाच किलो तांदूळ किंवा गहू दिले जात आहेत. त्यात आता पुढील तीन महिन्यांसाठी मोफत गहू किंवा तांदूळ मोफत दिले जाणार आहे. याशिवाय एक किलो डाळही मोफत दिली जाणार आहे. या योजनेचा 80 हजार गरिबांना लाभ मिळणार आहे.
8.3 कोटी महिलांना मोफत गॅस सिलिंडर
उज्ज्वला योजनेंतर्गत आठ कोटी 30 लाख महिलांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत घरगुती गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. देशात लॉकडाऊन आहे. त्याचा फटका गरीब जनतेला बसू नये यासाठी केंद्र सरकारने त्यांना दिलासा देणार्‍या मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात महिलांना पुढील तीन महिन्यांसाठी घरगुती गॅस सिलिंडर मोफत दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे महिला जन-धन खातेधारकांच्या खात्यात पुढील तीन महिन्यांसाठी दर महिन्याला 500 रुपये सरकारकडून जमा करण्यात येणार आहेत. जवळपास 20 कोटी महिला लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
राहुल गांधी यांच्याकडून मोदी सरकारचे कौतुक
केंद्र सरकारने गुरुवारी एक लाख 70 हजार कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून स्वागत केले आहे. अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करून सरकारचे कौतुक केले. ‘सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आर्थिक पॅकेज हे योग्य दिशेने टाकण्यात आलेले पहिले पाऊल आहे. लॉकडाऊनचा फटका सहन करणार्‍या शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे मजूर, कामगार, महिला आणि वयोवृद्ध व्यक्तींचे भारतावर ऋण आहे,’ असे राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply