Breaking News

पडझडीत घ्याव्यात अशा सहा कंपन्या

बाजारात सध्या होत असलेली पडझड ही उत्तम कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. ज्यांना गेल्या दोन महिन्यांतील तेजी पकडता आली नाही, त्यांच्यासाठी या चांगल्या सहा शेअर्सची शिफारस.

मागील आठवड्यात आपण बाजारात खूप हेलकावे पहिले. आठवड्याच्या सुरुवातीसच सीमेवर चीननं केलेल्या घुसखोरीच्या बातमीमुळं बाजाराशी घूस लागली तर गुरुवारी अमेरिकेत बेरोजगारीचे वाढते दर आणि सेवा क्षेत्रातील मंदी यामुळं टेक्नॉलॉजी कंपन्यांचे शेअर्स कोसळले. त्यामुळं शुक्रवारी आपल्या बाजारानं देखील तीच री ओढली. नक्कीच पुढील काही दिवस असं होणं क्रमप्राप्तच आहे. आपण नेहमीच ऐकत आलोय व अनुभवलं देखील आहे की, शेअरबाजारातील गुंतवणूक ही दीर्घकाळात उत्तम परतावा देते, आणि म्हणूनच बाजारातील अशी पडझड चांगल्या शेअर्सच्या खरेदीसाठी एक संधी ठरू शकते. त्यासाठी उत्तम कंपन्या निवडून ठेवणं गरजेचं आहे. प्रचलित उत्तम कंपन्या कोणत्या ते आपण सर्वच जण जाणून आहात. तर, मागील लेखाला धरून आपण काही स्मॉलकॅप अथवा मिडकॅप कंपन्या या लेखात पाहू. 

जेव्हा स्मालकॅप अथवा मिडकॅप निवडण्याचा प्रश्न येतो, तेव्हा निवडीसाठी सर्वांत महत्वाचा निकष असतो तो म्हणजे कंपनी संपूर्ण किंवा जवळपास ऋणमुक्त असणं. त्यानंतर कंपनीचं उत्पादन अफलातून हवं, कंपनीची विक्री व नफ्याचे आकडे वाढीचे हवे आणि कंपनीचं व्यवथापन चोख हवं. अशा निकषांवर सापडणार्‍या कंपन्यांच्या शेअर्स भाव आधीच वाढलेले आहेत परंतु पडत्या बाजारात योग्य भावात खरेदी केल्यास चांगला परतावा आपण अपेक्षित धरू शकतो. इथं प्रत्येक क्षेत्रातील माझ्या मतानुसार काही निवडक कंपन्या विचारात घेतल्या आहेत.

कावेरी सीड्स : ही कंपनी संकरित बियाणे उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनीकडं आंध्र प्रदेशात सुमारे 600 एकर शेत जमीन आहे. कंपनीची उत्पादनं दोन प्रकारांत मोडतात, पिकं व भाज्या. पिकांमध्ये मका कॉर्न, भात, कापूस, सूर्यफूल, मोहरी, ज्वारी, डाळी, बाजरी आणि गहू यांचा समावेश आहे तर भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, भेंडी, मिरची, टरबूज, लौकी आणि वांगी यांचा समावेश आहे. कंपनीचं बाजारमूल्य 3600 कोटी रुपये असून मागील तीन वर्षांतील विक्रीवृद्धी दर हा सुमारे 10% आहे. जून 2020च्या तिमाहीमध्ये मागील याच तिमाहीचे तुलनेत सुमारे 30% अधिक नफा नोंदवला आहे. (पुनर्संधी खरेदी भाव 500-535)

व्होल्टास : टाटा समूहातील कंपनी वातानुकूलन, रेफ्रिजरेशन तसेच इलेक्ट्रो-मेकॅनिकल प्रकल्पांच्या अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम (ईपीसी) कंत्राटदार म्हणून कार्यरत आहे. खाण, पाणी व्यवस्थापन आणि उपचार, बांधकाम उपकरणे आणि कापड उद्योग यासाठी अभियांत्रिकी उत्पादन सेवांच्या व्यवसायातही कंपनी गुंतलेली आहे. कंपनी वस्त्रोद्योगासहित खाण व बांधकाम उपकरणं; हीटिंग, वेंटिलेशन, वातानुकूलन आणि रेफ्रिजरेशन (एचव्हीएसी आणि आर) आणि वॉटर कूलर अशा प्रकारांत आपली उत्पादनं आणि डिस्पेंसर भारतात व मध्यपूर्वेसह पुरवते. प्रकार मिडकॅप, कंपनीचा मागील तीन वर्षांचा विक्रीवृद्धी दर 8.28% असून 25% आसपास लाभांश उत्पन्न आहे. जवळपास ऋणमुक्त कंपनी. सूचकखरेदी 550-600.

व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड : सर्वांच्या परिचयाची ही एक घरगुती उपकरणं उत्पादन करणारी कंपनी आहे. कंपनी प्रामुख्यानं रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, एअर कंडिशनर्स, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि छोट्या उपकरणांची निर्मिती करते. नुकताच कंपनीनं पाच रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे. तीन वर्षांचा विक्रीवृद्धी व नफ्याचा दर 15 टक्के असून या लॉकडाऊन काळात देखील कंपनीनं 1000 कोटी रुपयांचा विक्री टप्पा गाठला आहे.  कंपनीच्या प्रवर्तकांकडं 75% हिस्सा असून जवळजवळ 15 टक्के हिस्सा हा संस्थात्मक गुंतवणूकदारांकडं आहे. खरेदीस पूरक भाव : रुपये 1950-2000.

नॅशनल अ‍ॅल्युमिनिअम : रुपये 6700 कोटी बाजारमूल्य असलेली सरकारी अखत्यारीतली नवरत्न कंपनी आहे. ही कंपनी, एल्युमिना, अ‍ॅल्युमिनियम आणि उर्जा उत्पादनात असून तीन विभागांमध्ये कार्यरत आहे: रसायनं, अ‍ॅल्युमिनियम आणि अनऍलॉकोटेड कॉमन. रसायनांमध्ये कॅल्सीनेड एल्युमिना, अल्युमिना हायड्रेट व इतर संबंधित उत्पादने समाविष्ट आहेत. अ‍ॅल्युमिनियममध्ये अ‍ॅल्युमिनियम इनगॉट्स, वायर रॉड्स, बिलेट्स, पट्ट्या, रोल केलेले आणि इतर संबंधित उत्पादने समाविष्ट आहेत. एल्युमिना उत्पादनासाठी कॅप्टिव्ह वापरासाठी तयार करण्यात आलेल्या बॉक्साईटचा समावेश केमिकल्स विभागात केला जातो आणि अ‍ॅल्युमिनिअमच्या उत्पादनासाठी कॅप्टिव्ह वापरासाठी तयार होणारी उर्जा अ‍ॅल्युमिनियम विभागांतर्गत समाविष्ट केली जाते. नूतनीकरण योग्य उर्जा स्त्रोतांचा उपयोग करण्यासाठी मुख्यत: पवन उर्जा संयंत्र चालू असलेल्या सामान्य विभागात समाविष्ट केले जाते. 48% लाभांश देणारी व आपल्या पुस्तकी किंमतीच्या पाऊण किंमतीत उपलब्ध असलेली ही कंपनी सरकारी कचाट्यातून सुटल्यास 32-34 रुपये दरम्यान खरेदीस पूरक वाटते. 

एस्कॉर्ट्स लिमिटेड : ही एक अभियांत्रिकी कंपनी आहे, जी कृषी ट्रॅक्टर आणि बांधकाम उपकरणं बनवते. कृषि मशीनरी, वाहन सहाय्यक उत्पादने, रेल्वे उपकरणे, बांधकाम उपकरणं अशा प्रकारचे कंपनीचे विभाग आहेत. ही कंपनी कृषी ट्रॅक्टर, अर्थ मूव्हर्स आणि मटेरियल हँडलिंगसाठी लागणारी यंत्रं देखील पुरवते. मागील तीन वर्षांचा विक्री-वृद्धी दर 12 टक्के तर नफ्याचा वृद्धी दर 52 टक्क्यांवर आहे. नजीकचा विचार केल्यास 1075 – 1100 रुपये दरम्यान, खरेदी केल्यास चांगला नफा मिळवता येऊ शकतो.

अमर राजा बॅटरीज : ऍमेरॉन नावानं आपल्याला परिचित असलेली ही भारतातील औद्योगिक आणि ऑटोमोटिव्ह अनुप्रयोगांसाठी लीड-ऍसिड स्टोरेज बॅटरी उत्पादक कंपनी आहे. त्याखेरीज कंपनीची उत्पादनं टेलिकॉम, रेल्वे, उर्जा नियंत्रण, सौरऊर्जा आणि अखंड वीजपुरवठा (यूपीएस) औद्योगिक बॅटरी व संरक्षण यंत्रणा व्यवसायाखालील विविध उपकरणं आणि ऑटोमोबाइल मूळ उपकरणे उत्पादक (ओईएम) यांना पुरविली जातात. 12600 कोटी बाजारमूल्य असलेली ही मिडकॅप कंपनी असून कंपनीनं जूनअखेरच्या तिमाहीत 1150 कोटी रुपयांची विक्रीवर 63 कोटी रुपयांचा नफा दर्शवला आहे. मागील दहा वर्षातील विक्रीवृद्धीचा दर 16 टक्क्यांवर तर नफावृद्धीचा दर हा 15 टक्क्यांहून अधिक आहे. तत्कालिक खरेदी रुपये 680-700.

येत्या आठवड्यात बाजार काहीसा दोलायमनाच राहील असं वाटतं. निफ्टी 50 साठी 11300 हा लागलीच आधार तर त्याखाली 11100 ही आधारपातळी संभवते. वरील बाजूस पुन्हा 11550 हा मोठा अडथळा वाटतो. जोपर्यंत 10900 पातळीखाली निफ्टी स्थिरावत नाही तोपर्यंत प्रत्येक पडझडीत संधी म्हणून वरील कंपन्यांचा विचार करता येऊ शकतो. अर्थातच गुंतवणूक म्हणून.

सुपरशेअर : सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच सीडीएसएल

आज देशात केवळ दोनच संस्था डिपॉझिटरी सुविधा पुरवतात त्या म्हणजे नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड. त्यापैकी पहिली संस्था अजून बाजारात नोंदणीकृत झालेली नाहीये आणि आज बहुतेक सर्व ब्रोकर्स हे सीडीएसएलद्वारेच डीमॅट खाती उघडत आहेत. गेल्या चार महिन्यांत वीस लाखांहून अधिक खाती लॉकडाऊनमध्ये उघडली गेली आहेत. कारवी कंपनीच्या घोळानंतर गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेसाठी आता 1 सप्टेंबरपासून लागू केल्या गेलेल्या नव्या नियमानुसार सर्व ट्रेडर्सना आपल्या खात्यातील शेअर्स प्लेज करणं अनिवार्य आहे. प्रत्येक प्लेज करताना व डी-प्लेज करताना सीडीएसएल कमीतकमी 25 रुपये अथवा मूल्याच्या 0.01 टक्का इतके शुल्क आकारणार असल्यानं आपसूकच कंपनीचा नफा वाढणार यात दुमत नाही आणि म्हणूनच हा शेअर गेल्या आठवड्यात सुमारे साडेनऊ टक्के वाढलाय. दीर्घावधीसाठी आपल्या पोर्टफोलिओमधील एक हिरा ठरू शकणारी ही मिडकॅप कंपनी नक्कीच चांगला परतावा देऊ शकेल.

– प्रसाद ल. भावे.  (9822075888)

sharpadvisers@gmail.com

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply