Breaking News

जखमी गोविंदांसाठी मोफत रुग्णवाहिका

नवी मुंबई ः प्रतिनिधी

दहीहंडी साजरी करताना दुखापतीचा व अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अशा वेळी तत्काळ वैद्यकीय सेवा देणे फार गरजेचे असते. याच सामाजिक जाणिवेतून नेरुळ-नवी मुंबई येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे गोविंदा पथकांना प्रथमोपचार देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रफळात शनिवार 24 ऑगस्ट रोजी मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यात येणार आहे. या सेवेअंतर्गत गोविंदा पथकातील जखमी गोविंदांना प्रथमोपचार व पुढील उपचार करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. या रुग्णवाहिकेत डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय मदतनीस यांचा समावेश आहे. सेवेसाठी  9222666000  या क्रमांकावर संपर्क साधावा.

घनदाट जंगलाला भीषण आग

नवी दिल्ली ः जगातील सर्वात मोठे जंगल म्हणून ओळखल्या जाणार्‍या अ‍ॅमेझॉन पर्जन्यवनात भयंकर वणवा पसरला आहे. मागील तीन आठवड्यांपासून हा वणवा धगधगत असून त्याने रौद्ररूप धारण केले आहे. मागील 15 दिवसांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेल्या या अ‍ॅमेझॉनच्या जंगलामध्ये दहा हजारांहून अधिक जागी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीत आतापर्यंत हजारो पक्षी, प्राणी आणि दुर्मीळ वनस्पती जळून खाक झाले आहेत. या आगीमुळे अ‍ॅमेझॉन, रोडांनिया आणि साओ पाओलोवर धुराचे ढग जमा झाल्याने भरदिवसा अंधार झाला आहे. या आगीमुळे सर्वाधिक नुकसान ब्राझीलमध्ये झाले असून तेथील 2700 किमीचे क्षेत्र प्रभावित झाले आहे. जगाचे फुप्फुस म्हणून ओळखल्या जाणार्‍या अ‍ॅमेझॉनच्या जंगलांना लागलेली आग इतकी भीषण आहे की वणव्यांमधून निघणारा धूर अंतराळातूनही दिसत आहे.

शेअर बाजारात मोठी घसरण

मुंबई ः अर्थव्यस्थेत सध्या सुस्तीचे वातावरण असताना शुक्रवारी शेअर बाजारातही मोठी घसरण पाहायला मिळाली. बाजार खुला झाला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 307 अंकांनी कोसळला. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाचेही मूल्य घटले असून आता एका डॉलरची किंमत 72.03 रुपये इतकी झाली आहे. गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 580 अंकांनी पडून बंद झाला होता. त्यामुळे आता कशा पद्धतीने शेअर बाजार उघडतो याकडे सर्वांचे लक्ष होते, मात्र बाजार सुरू होताच सेन्सेक्स अपेक्षेप्रमाणे 300 अंकांनी घसरला आणि 36,136वर स्थिरावला होता. या घसरणीमुळे सेन्सेक्स गेल्या पाच महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहचला, तर रुपयानेदेखील आजच्या 36 पैशांच्या घसरणीसह गेल्या आठ महिन्यांची नीचांकी नोंद केली. त्यामुळे एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 72.03 इतकी झाली आहे.

शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार

विमाननगर : भावाला जीवे मारण्याची धमकी देत 14 वर्षांच्या शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना धानोरी येथे घडली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपी धनंजय मारपल्ली (28, रा. धानोरी, विश्रांतवाडी) याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही आरोपीच्या घराजवळ राहते. तू माझ्याशी बोलत जा. मी सांगतो तसे कर, असे म्हणत भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply