Breaking News

नवसाला पावण्याचे दावे; गणेश मंडळांवर कारवाईची शक्यता

मुंबई ः प्रतिनिधी

भक्तांची गर्दी खेचण्यासाठी मंडळांनी खास ’नवसाचे’ मार्केटिंग फंडे वापरणे नवीन नाही. मात्र, सार्वजनिक गणपतीसाठी ’नवसाला पावणारा’, ’इच्छापूर्ती करणारा’ अशा टॅगलाइन वापरून गणेशभक्तांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे वेड आता मोठ्या मंडळांसह लहान मंडळांतही झपाट्याने पसरताना दिसत आहे. मंडळांचे हे मार्केटिंग कौशल्य अंधश्रद्धेकडे झुकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित मंडळांवर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, नवसाच्या बहाण्याने कोणीही भक्ताने स्वतःला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास, त्यास उद्युक्त केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाईची तरतूदही कायद्यात आहे. मागील काही वर्षात गणेश मंडळांमधील स्पर्धा वाढत राहिल्याने उत्सवातील लोकभावनांची गुंतवणूक पाहून अनेक मंडळांनी आपल्या बाप्पांना ’नवसाला पावणारा’ असे बिरुद लावून भक्तांची गर्दी खेचण्याला सुरुवात केली. मात्र अनेक मंडळांकडून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा ओलांडली जात असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणार्‍या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. छोट्या मंडळांमध्ये हा फंडा वेगाने पसरत असला तरी अनेक मोठी मंडळेही अशा ’नवसपूर्ण’ जाहिराती करण्यात आघाडीवर आहे. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत, अशा चुकीच्या पद्धतीने जाहिराती करून पैसा उकळण्याचा वा कोणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास, तसेच नवसाच्या बहाण्याने एखाद्याला स्वतःच्या जीवास धोका निर्माण करण्यास भाग पाडल्यास कारवाई होऊ शकते.

Check Also

शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचा पनवेलमध्ये दर्शन सोहळा

नियोजन बैठकीत तयारीचा आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 18 …

Leave a Reply