Breaking News

माणगावात कोरोनाचा वाढता संसर्ग

11 दिवसांत आढळले 306 कोरोनाबाधित

माणगाव ः प्रतिनिधी – कोरोनाने मागील 11 दिवसांत माणगाव तालुक्यात धुमाकूळ घातला असून या ठिकाणी   सातत्याने 35 ते 40च्या संख्येने कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाबरोबरच तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. शनिवारी तालुक्यातील 28 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी दिली. तालुक्यात आतापर्यंत विविध गावांतून 1026 जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी 716 रुग्ण बरे होऊन 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

माणगावात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून सतत कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत आहेत. 11 दिवसांच्या कालावधीत तालुक्यात तब्बल 306 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने लोक भयभीत झाले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्ण ज्या घरातील आहेत तेथे स्थानिक प्रशासनाने कोरोना प्रतिबंध क्षेत्र म्हणून बॅनर लावावे, असे

निर्देश जिल्हाधिकार्‍यांकडून देण्यात आले आहेत, मात्र माणगावात याकडे दुर्लक्ष केले जात आहे. माणगाव नगरपंचायत हद्दीत अनेक घरांतून कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्या घराच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंध क्षेत्राचे बॅनर लावले पाहिजेत, मात्र अजूनही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या काही घरांजवळ असे बॅनर लावलेले दिसत नाहीत. त्यामुळे येथे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती नसल्याने  लोक तेथे जाताना दिसतात. यातूनही संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काही कोरोनाग्रस्तांना क्वारंटाइन राहण्यास सांगितले असतानाही ते रस्त्यावर फिरताना दिसतात. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधितांना घरी जाण्यासाठी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा हे रुग्ण खासगी वाहनांमधून गेल्यास त्याचा संसर्ग वाहनचालकाला होऊ शकतो. माणगावात गेल्या काही दिवसांत दोन तरुण कोरोनाने मृत्युमुखी पडल्याने याचा धसका तालुक्यातील जनतेने घेतला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी सरकारच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी

प्रशाली जाधव-दिघावकर यांनी केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply