Breaking News

शेताचे बांध तोडून पाली-खोपोली राज्य महामार्गाचे रुंदीकरण

बाधित शेतकर्‍यांचा विरोध; तहसीलदारांना निवेदन

पाली : प्रतिनिधी

खोपोली-पाली राज्य महामार्गालगतच्या पिकत्या शेतीचे कुंपण व बांध जबरदस्तीने तोडून रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे बाधीत शेतकर्‍यांनी बुधवारी (दि. 17) या महामार्गावर उतरून रुंदीकरण कामाला कडाडून विरोध केला. जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय मिळत नाही, तोपर्यंत रुंदीकरणाचे काम होऊ देणार नाही, न्याय्य हक्कांसाठी आंदोलन उभारू, असा इशारा त्यांनी या वेळी दिला व आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना दिले.

राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाकण-पाली-खोपोली रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी बाधित शेतकर्‍यांना विश्वासात न घेता किंवा लेखी नोटीस न देता पिकत्या शेतीचे कुंपण व बांध तोडून जबरदस्तीने रस्ता रूंदीकरणाचे काम चालू करण्यात आले आहे. त्यामुळे काही अल्प भुधारक शेतकर्‍यांवर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. परिणामी महामार्ग बाधित शेतकरी संतप्त झालेले आहेत. त्यांनी यासंदर्भात तहसीलदार रायन्नावार यांना बुधवारी निवेदन दिले, या वेळी सुधागड शेतकरी समन्वय संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव गिरीश काटकर, सचिन तेलंगे, पांडुरंग तेलंगे राजेंद्र खरिवले, विक्रम परमार, बाळाराम काटकर, सुनिल ठोंबरे, देऊ गदमळे, दिपक वालगुडे,मिलिंद खंकाल, रवींद्र जाधव, राम भोईर, पार्वती मनवी, जयश्री ठोंबरे आदींसह शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

बाधित शेतकर्‍यांचे प्रश्न योग्य प्रकारे समजून घेवून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असून सदर निवेदनाची प्रत रायगडचे जिल्हाधिकारी, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनाही दिल्या आहेत.

सुधागड शेतकरी समन्वय संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन प्रशासनस्थरावर योग्य व न्यायिक भूमिका घेतली जाईल. एकाही शेतकर्‍यावर अन्याय होणार नाही, यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील.

-दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली सुधागड

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply