Wednesday , June 7 2023
Breaking News

चिमुकल्याचे अपहरण करणार्या दाम्पत्यास चार तासांत अटक

पनवेल ः वार्ताहर

उलवे भागात राहणार्‍या हसिना अब्दुल हमिद शेख (25) या महिलेच्या अडीच वर्षांच्या मुलाचे अपहरण करणार्‍या दाम्पत्यास एनआरआय सागरी पोलिसांनी अवघ्या चार तासांच्या आत पकडून अपह्रत मुलाची सुखरूप सुटका केली. सरोज जिनत राव (27) आणि जिन्नत बचरसिंग राव (28) असे अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव असून त्यांनी आर्थिक देवाणघेवाणीतून शेख यांच्या मुलाचे अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली.

तक्रारदार हसिना शेख व आरोपी राव दाम्पत्य एकमेकांच्या ओळखीचे आहेत. हसिनाचा पती अब्दुल हमिद शेखकडे दोन गाड्या असल्याने त्यातील एक कार त्याने आरोपी जिन्नत रावला 65 हजार रुपयांना विकली होती, तसेच सदर कारवरील कर्ज जिन्नतच्या नावावर ट्रान्सफर केले होते. व्यवहारातील काही रकमेची देवाणघेवाण बाकी असतानाच शनिवारी सायंकाळी सरोज राव ही पतीसह हसिनाच्या उलवे येथील घरी गेली होती. या वेळी तिने हसिनाच्या मुलास आइस्क्रीमच्या बहाण्याने आपल्यासोबत नेले. त्यानंतर या दाम्पत्याने हसिनाच्या मुलाचे अपहरण करून पलायन केले. हा प्रकार हसिनाच्या लक्षात आल्यानंतर तिने तत्काळ एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, आरोपी दाम्पत्य आपल्या कारने राजस्थानला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी नवी मुंबई ते राजस्थानदरम्यान महामार्गावर असलेल्या सर्व टोलनाक्यांशी संपर्क साधून त्यांना आरोपींच्या वाहनाची माहिती व वाहनाचा नंबर दिला. दरम्यान, आरोपी राव दाम्पत्य अपह्रत मुलासह राजस्थानला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर रात्री 10च्या सुमारास भरुच स्थानिक गुन्हे शाखा व एसओजीच्या पथकाने राव दाम्पत्यास भरुच टोल नाक्यावर पकडले.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply