Breaking News

भारतीय मजदूर संघाचे रोजी रोटी वाचवा अभियान

उरण : प्रतिनिधी

भारतीय मजदूर संघाने रोजी रोटी वाचवा अभियानाच्या निमित्ताने जिल्ह्यातील कामगार व कष्टकार्‍यांच्या वतीने सर्वत्र जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले, त्याचे पडसाद उरणमध्येही उमटले आहे. शुक्रवारी (दि. 11) भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष कामगार नेते सुरेश पाटील यांनी उरणच्या तहसिलदारांकडे निवेदन सादर केले आहे.

लॉकडाऊनमुळे सामान्य कामगार स्वयंरोजगार करणारे कामगार हे अत्यंत अडचणीत आले आहेत. अनेक कामगारांना कोरोना काळातील वेतनही अद्याप मिळालेले नाही. घरेलू कामावर घेतले जात नाही. टॅक्सी, रिक्षा सुरू झाल्या मात्र व्यवसाय नाही. मंदिर अद्यापही बंद असल्याने यावर उपजीविका आधारित असलेल्या हजारो कामगारांच्या कुटुंबियांची अजूनही उपासमार होत आहे. या पार्श्वभूमीवर रोजी रोटी वाचवा अभियान राबविण्यात आले.

केंद्र सरकारने कामगारांसाठी लागू केलेल्या अनेक योजनांची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात झालेली नाही. लाखो कामगार व नागरिकांना शासनाने दिलेले अल्पदरातील धान्य मिळालेले नाही. रोजगार हमीच्या कामांचा निधी अन्यत्र वळविण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य कामगार रोजगाराला मुखले आहेत. ते पूर्ण स्थापित करण्याची आवश्यकता आहे. या सर्व प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष केंद्रित व्हावे यासाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने रोजी रोटी वाचवा अभियान राज्यात सर्वत्र राबविण्यात आले आहे.

कोरोना काळात कामावरून कमी करण्यात आलेल्या कायम व कंत्राटी कामगार, कर्मचारी आणि प्रकारचे नोकर यांना कामावर घेण्यात यावे, असे आदेश सरकारने द्यावेत. शासनाचे आदेश असतांना कोरोना काळात वेतन न दिलेल्या कामगारांना संपूर्ण वेतन मिळावे. स्वस्त धान्य न मिळालेल्या कामगार व नागरिकांना स्वस्त धान्य देण्याची व्यवस्था करावी. महात्मा फुले जन आरोग्य विमा योजना कोरोनाच्या सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी रुग्णालयातून लागू करण्यात यावी. राज्यातील सर्व रोजगार सुरु करण्यात यावेत, ज्यांचे रोजगार सुरू झाले नाहीत त्यांना निर्वाह भत्ता देण्यात यावा. याशिवाय स्थलांतरित नोंदणी सुरू करण्यात येऊन त्यांना रोजगार देण्यात यावा. राज्यातील सर्व कामगारांना त्याचे जीवन नियमित सुरू करता यावे, त्यांचा रोजगार सुरक्षित रहावा प्रभावी उपाययोजना लवकरात लवकर करावी व महाराष्ट्र राज्यातील जनजीवन पूर्व पदावर येण्यासाठी कार्यवाही करावी, असे निवेदन भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा कामगार नेते सुरेश पाटील यांनी उरणच्या तहसिलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply