पनवेल : वार्ताहर
पनवेल मधील एका शिक्षिकेसोबत सोशल मीडियावरून मैत्री केल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी नाट्यमय रित्या सापळा रचून अटक केली आहे.
कृष्णा मेंगळ (वय 32, रा. अहमदनगर) असे या आरोपीचे नाव असून त्याने वर्षभरापूर्वी पीडित शिक्षिकेशी सोशल मीडियावरून मैत्री करून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर त्याने पीडित शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. याचदरम्यान, त्याने वेगवेगळ्या बहाण्याने तिच्याकडून तब्बल 11 लाख 80 हजारांची रक्कम उकळली. त्याने पीडित शिक्षिकेशी लग्न करण्यास टाळाटाळ सुरू केल्यानंतर तिने आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याने आपल्या मूळ गावी पलायन केले. त्यानंतर त्याने शिक्षिकेच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधून शिवीगाळ केली. तसेच तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. अखेर शिक्षिकेने पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्कारासह, फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी त्यांच्या पथकाला मार्गदर्शन करून सूचना दिल्या. त्यानुसार हे पथक तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा काही कामानिमित्त करंजाडे येथील एका मेडिकल स्टोर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन अटक केली. सदर आरोपीने अश्या प्रकारे अजून काही गुन्हे केले आहे का याचा तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.