पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोना महासाथीचा मुकाबला करताना ’संगठन ही सेवा’ या उपक्रमांतर्गत विविध सेवाकार्य भाजपचे कार्यकर्ते राज्यभर करीत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने सेवा सप्ताह, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम कोरोनासंबंधित सर्व नियमांचे पालन करून आयोजित करण्यात येणार आहेत. पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वसामान्यांसाठी देवदूताप्रमाणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजीचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येतो. दरवर्षी पक्षाचे सर्व कार्यकर्ते सेवा सप्ताहादरम्यान विविध प्रकारचे सेवाकार्य करून पंतप्रधानांना दीर्घायुष्य लाभण्याची प्रार्थना करतात.
यंदा पंतप्रधानांचा 70वा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार 14 ते 20 सप्टेंबरपर्यंत सेवा सप्ताह असून त्या अंतर्गत विविध सामाजिक सेवा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. प्रत्येक मंडलात 70 दिव्यांगांना विविध प्रकारचे कृत्रिम अवयव व उपकरणे प्रदान करण्यात येणार आहेत. 70 गरीब बंधू-भगिनींना आवश्यकतेनुसार चष्मा, प्रत्येक जिल्ह्यात 70 गरीब वस्त्या आणि रुग्णालयांत कोरोनाचे नियम पाळून फळांचे वाटप, कोरोनाची लागण झालेल्या 70 जणांना स्थानिक गरजेनुसार व रुग्णालयाच्या माध्यमातून प्लाझ्मा दान करणे, युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिरे, प्रत्येक बूथमध्ये 70 वृक्षांची लागवड आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प, स्वच्छता अभियान, एकदा वापरल्या जाणार्या प्लास्टिकपासून मुक्तीचा संकल्प आदी उपक्रम राबवून पंतप्रधानांच्या स्वच्छतेविषयक आवाहनाला साथ देण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या कार्यापासून सर्व जण प्रेरणा घेत आहेत. या संदर्भात त्यांचे व्यक्तित्व आणि कार्याविषयी वेबिनारच्या माध्यमातून 70 मोठ्या व्हर्चुअल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात येणार असून या परिषदांत समाजातील बुद्धिजीवी आणि प्रबुद्ध नागरिकांना संबोधित करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीही पंतप्रधानांचे व्यक्तित्व आणि कार्याविषयी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा कोरोनाची साथ ध्यानात घेता पंतप्रधानांविषयी 50 स्लाइडचे प्रदर्शन सोशल मीडियामार्फत प्रसारित करण्यात येणार आहे.
सर्वांचे प्रेरणास्त्रोत व पक्षाला विचारधारा प्रदान करणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती 25 सप्टेंबर रोजी आहे. सर्व बूथवर पंडित दीनदयाळ यांची जयंती साजरी केली जाणार आहे. कोरोनामुळे वेबिनारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात पक्षाची विचारधारा आणि पंडित दीनदयाळजी यांच्या जीवनचरित्राविषयी प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती आहे. यानिमित्त गेल्या वर्षी देशभरात भाजपच्या वतीने गांधी संकल्प यात्रेचे आयोजन तसेच स्वदेशी, स्वावलंबन, साधेपणा व स्वच्छतेविषयी महात्मा गांधी यांच्या विचारांचे जागृती अभियान राबविण्यात आले होते. त्या अनुषंगाने यंदा 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पंतप्रधानांचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प विविध प्रकारच्या संवादांच्या कार्यक्रमांतून जनतेपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. यात खादीचा उपयोग व स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन तसेच प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी सर्वसामान्यांसाठी 20 लाख कोटींचे ’आत्मनिर्भर भारत’ पॅकेज जाहीर केले आहे. त्यातील विविध योजनांची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी बूथ स्तरापर्यंत प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे. सदर विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रयत्न करणार आहेत. आत्मनिर्भर भारत पॅकेज व त्याच्या विविध योजनांशी संबंधित वेबिनारचे आयोजनही करण्यात येणार असून त्यामध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …