Breaking News

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर

सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याची बैठक रविवारी (दि. 13) पनवेल येथे झाली. या बैठकीत विविध ठराव करण्यात आले. यामध्ये मराठा समाजाचे आरक्षण कायम ठेवण्याबाबत राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाने नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, असे सांगत या आरक्षणाच्या अंमलबजावणीस नुकतीच स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरविण्यासाठी सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याची बैठक रविवारी पनवेल येथील व्ही. के. हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पेण, उरण, कर्जत, पनवेल, खालापूर येथील मराठा समन्वयक सोशल डिस्टन्सिंग पाळून मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीत अनेक ठराव करण्यात आले. त्यामध्ये राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शैक्षणिक प्रवेशावर बंदीबाबतचा निर्णय ज्या तत्परतेने घेतला त्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारने मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षण कायम ठेवण्याबाबत तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी या वेळी करण्यात आली. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे सर्व मराठा समाजात तीव्र नाराजी असून, ही नाराजी व्यक्त करण्यासाठी घटनात्मक मार्गाने शासकीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याबाबत या वेळी सर्वांचे एकमत झाले. संपूर्ण महाराष्ट्रातील समन्वयकांशी समन्वय साधून आंदोलनाची तारीख निश्चित केली जाणार आहे. याखेरिज जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने कोणत्याही विभागात नोकरभरती करू नये, असे सूचित करण्यात आले. या बैठकीस जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांच्यासह गणेश कडू, वृषाली शेडगे, राजश्री कदम, स्वप्नील काटकर, तुषार सावंत, दशरथ पाटील, प्रदीप देशमुख, सुहास येरुणकर, रूपेश कदम, राजू भगत, यतिन देशमुख, सचिन भगत, विकास वारदे, राजू नलावडे आदी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply