Breaking News

नुकसानभरपाई न मिळाल्यास टपरीधारक करणार आंदोलन

मुरूड ः प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळात मुरूड शहरातील 44 टपरीधारकांचे अतोनात नुकसान झाले होते. मुरुड नगरपरिषदेकडून नुकसानीचे रीतसर पंचनामे करून तहसील कार्यालय मुरूडला सुपूर्द करण्यात आले होते, परंतु तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी जाऊन सुद्धा नुकसानीची रक्कम प्राप्त न झाल्याने सर्व टपरी धारक आक्रमक झाले आहेत. तसेच समाजसेवक अरविंद गायकर यांच्या 16 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या उपोषणाला टपरीधारकांनी पाठिंबा दर्शवला असून पूर्ण समर्थन करण्याचे त्यांना आश्वासीत केले आहे.

मुरूड समुद्र किनार्‍यावरील टपरीधारक आणि पत्रकारांसमवेत समाजसेवक गायकर यांनी या भागाची पाहणी करून दयनीय अवस्थेत पडलेल्या गाड्या व झालेले नुकसान दाखवून दिले. या वेळी उपस्थित टपरीधारकानी शासनाने भरपाई न दिल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही या टपरीच्या जीवावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होतो, परंतु नुकसान खूप मोठे झाल्याने व्यवसाय कसा सुरू करावयाचा हा यक्षप्रश्न त्यांना सतावत आहे. राज्य शासनाचे पैसे तहसील कार्यालयात येऊन सुद्धा मिळत नसतील तर काय उपयोग. आम्हाला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, असा सूर या वेळी त्यांनी आळवला आहे.

समाजसेवक अरविंद गायकर यांनी समुद्र किनार्‍यावरील घरांना नुकसान भरपाई मिळते, परंतु टपरीधारकांना सीआरझेडचा कायदा आडवा का येतोय. मोठमोठ्या धनिकांचे बंगले अजून तसेच आहेत, परंतु टपरीधारकांवर अन्याय का? शासनाने त्वरित न्याय द्यावा, अन्यथा उपोषणाच्या या निर्णयावर ठाम असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. या वेळी चक्रीवादळात नुकसानग्रस्त झालेल्या टपर्‍या आहेत तशाच आहेत, परंतु राज्य शासन लक्ष देत नाही. त्यामुळे टपरीधारक बेहाल झाले असून न्याय न मिळाल्यास ते आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply