Breaking News

नागोठण्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याबाबत बैठक

नागोठणे : प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात लॉकडाऊन जारी केला आहे. जनतेला जीवनावश्यक साहित्य मिळणे अत्यावश्यक असल्याने येथील व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी आणि पोलीस अधिकारी यांच्यात नुकतीच पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. त्यात सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत किराणा तसेच दूध आणि भाजीपाल्याची दुकाने, दुकानदार तसेच इतर ग्राहकांच्या आरोग्याची दक्षता घेऊन उघडी ठेवण्यात येत असल्याचे व्यापारी संघटनेकडून सांगण्यात आले.

संचारबंदी लागू असतानाही काही उनाडटप्पू आपल्या दुचाकीवरून फिरताना दिसत आहेत. पोलिसांनी त्यांना चौदावे रत्न दाखविण्यास सुरुवात केल्याने त्यांची संख्या दोन दिवसांत आटोक्यात येईल असे बोलले जात आहे. काही गावे तसेच शहरातील काही भागांत मागील दोन दिवसांपासून प्रवेशद्वारावरच अडथळा उभारून बाहेरून येणार्‍या व्यक्तींना अनधिकृतपणे प्रवेशबंदी करण्यात आली होती. नागोठणे पोलिसांनी यात तातडीने लक्ष घातल्याने सर्व गावात जाणारे रस्ते गुरुवारपासून पुन्हा खुले करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील विलगीकरण कक्षात आतापर्यंत परदेशातून आलेल्या चार व्यक्तींना दाखल करण्यात आले होते. या चौघांत कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून न आल्याने होम क्वारंटाइन म्हणून त्यांच्या घरी पाठविण्यात आले असून दक्षतेची उपाययोजना म्हणून आरोग्य केंद्रात डॉक्टर तसेच इतर आरोग्य कर्मचारी 24 तास तैनात करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply