Breaking News

पनवेल परिसरात कोरोनामुळे ऑक्सिमीटरच्या मागणीत वाढ

थर्मल गनचीही होतेय खरेदी

कळंबोली : रामप्रहर वृत्त – पनवेल परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. कोरोनाबाधितांची संख्या 15 हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. वाढत्या रुग्णांमुळे पनवेलकरांचा स्वत:ची काळजी घेण्यासाठी विविध घरगुती उपाय करीत आहेत. त्याचबरोबर औषध विक्रेत्यांकडून ऑक्सिमीटर, थर्मल गन घेण्याकडे कल वाढला आहे, तर सॅनिटायझरची मागणी मात्र कमी झाल्याचे दिसून येत आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजारांच्या उंबरठ्यावर गेली आहे. कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल, पनवेल परिसरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. अनलॉकमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, व्यापारी, कामगार, रोजंदारीवर काम करणारे नागरिक घराबाहेर पडत आहेत.

सुरक्षिततेसाठी घरीच हळदीचे दूध, गरम वाफ घेणे आदी उपाय केले जात आहेत. त्याचबरोबर, औषधी दुकानातून ऑक्सिमीटर खरेदी करण्याचा कल वाढला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे व कोरोना संसर्ग नसलेले नागरिक आपल्या शरीरातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी ऑक्सिमीटरचा वापर, तर शरीरातील तापमान चेक करण्यासाठी थर्मल गनची खरेदी करीत आहेत. त्यामुळे ऑक्सिमीटरच्या मागणीत वाढ झाली आहे.

ऑक्सिमीटर व थर्मल गनची मागणी वाढली असताना सद्यस्थितीत सॅनिटायझरची मात्र मागणी घटली असल्याचे पनवेल येथील मंगेश सर्वदे या औषध विक्रेत्याने सांगितले.

उत्पादन वाढीने दरात घसरण

पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध औषधी दुकानांत चार महिन्यांअगोदर ऑक्सिमीटरची तीन ते चार हजार रुपये किंमत होती. मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने मध्यंतरी ऑक्सिमीटरचा तुटवडा भासत होता. अनलॉकच्या दुसर्‍या टप्प्यात अनेक कंपन्यांनी ऑक्सिमीटर व थर्मल गनच्या उत्पादनात वाढ केल्याने किमतीत घट झाली आहे, तर विविध कंपन्यांचे ऑक्सिमीटर 500 ते एक हजार रुपयांत मिळत असल्याने मागणीत वाढ झाली आहे.

घरगुती मास्क वापरावर भर

पनवेल, कळंबोली, कामोठे परिसरातील नागरिक सुरुवातीला एन 95च्या मास्कचा वापर करण्यावर भर दिला जात होता. कालांतराने घरगुती मास्कचा वापर वाढल्याने औषध दुकानातून मास्क खरेदी घटली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply