Breaking News

पाली शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यात प्रशासनाला अपयश

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. शहरात येणार्‍या लक्झरी बसेस, डंपर, मोठे ट्रक यामुळे होणार्‍या वाहतूक कोंडीचा सामना सर्व नागरिकांना करावा लागत आहे. शहरातील लव्हाटे चौक ते अथर्व हॉटेलपर्यंत लक्झरी बसेस, डंपर यांच्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत आहेत.

पाली हे अष्टविनायकांपैकी एक स्थळ आहे. येथील बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी दरदिवशी हजारो भक्त-भाविक पाली शहरात येतात. त्यांच्या लक्झरी बसेस  मोठ्या असल्यामुळे पाली शहरातील अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होते. सुधागड तालुक्यातील भार्जेवाडी येथे दगडी खाण आहे. त्या खाणीतील दगड, ग्रिट यांची वाहतूक करणारे डंपर खोपोली व वाकणकडे जातात. त्यांना पाली शहरातून जावे लागते. रात्रदिवस या डंपरची वाहतूक सुरू असते. त्यामुळे पाली शहरातील अरुंद रस्त्यावर सारखी वाहतूक कोंडी होताना दिसून येते.

पाली ही सुधागड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतील दुकानासाठी मालाचा पुरवठा करणारे मोठे ट्रक पाली शहरात येतात. हे  ट्रक दुकानाबाहेरील रस्त्यावरच उभे केले जातात. त्यामुळे रस्त्याची एक बाजू अडवली जाते. त्याचा वाहनांच्या रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे हटालेश्वर चौक ते गांधी चौक यामधील रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते.

पाली शहरातील वाहतूक कोंडीवरील प्रश्नावर पोलीस व महसूल प्रशासन तसेच नगरपंचायतीकडून दुर्लक्ष केले जात आहे. केवळ शासकीय यंत्रणेतील उदासीनतेमुळे पालीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न तसाच पडून आहे.या तिन्ही यंत्रणांनी वाहतूक कोंडीवर ठोस मार्ग काढण्याची गरज आहे.

-संदीप सिलिमकर, अध्यक्ष, सुधागड तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समिती

Check Also

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ‌सीकेटी‌ विद्यालयाचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल …

Leave a Reply