Breaking News

माणगाववासीयांचा भ्रमनिरास; सत्ताधार्‍यांचे आश्वासन हवेतच विरले; ग्रामस्थांत नाराजी

माणगाव ः प्रतिनिधी

माणगाव नगर पंचायतीच्या 10 जानेवारी 2016 रोजी झालेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विविध ठळक विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन हद्दीतील ग्रामस्थांना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देण्यात आले होते, मात्र सत्ताधार्‍यांचे हे आश्वासन हवेतच विरले असून, मागील पाच वर्षांत माणगावनगरीत सत्ताधार्‍यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी एकही ठळक विकासकाम मार्गी लावले नसल्याचा आक्षेप हद्दीतील ग्रामस्थांनी घेतला आहे. सत्ताधार्‍यांनी माणगाववासीयांचा भ्रमनिरास केला असून याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त करून येणार्‍या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, अशा शब्दांत ग्रामस्थांनी इशारा देत नाराजी व्यक्त केली आहे.माणगाव ग्रामपंचायतीनंतर जून 2015मध्ये माणगाव नगर पंचायत अस्तित्वात आली. यानंतर माणगाव नगर पंचायतीची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक 10 जानेवारी 2016 रोजी होऊन या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना विकासकामांचे गाजर दाखवून आपली सत्तेची पोळी भाजून घेतली. यानंतर मागील पाच वर्षांत सत्ताधार्‍यांनी ग्रामस्थांच्या तोंडाला विकासकामांच्या नावाने पाने पुसली आहेत. नगर पंचायत निवडणुकीदरम्यान दिलेल्या एकाही ठळक अशा विकासकामाची पूर्तता मागील पाच वर्षांत सत्ताधार्‍यांकडून झाली नाही.  केवळ छोटी अंतर्गत रस्त्यांची कामे करून त्यांनी सुरुवातीला विकासकामांचा गवगवा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर अन्य दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पाळले नाही. आज येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. हद्दीतील अनेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. सत्ताधार्‍यांनी निवडणुकीदरम्यान माणगावात नाट्यगृह, नाना-नानी पार्क, नगर पंचायतीची नवीन इमारत, लोकांना विरंगुळा मिळण्यासाठी बगीचा अशी काही ठळक विकासकामांची आश्वासने दिली होती, मात्र यापैकी एकही काम मार्गी लागले नाही. आता बघता बघता सत्ताधार्‍यांची पाच वर्षे संपत आली असून 2021ची नगर पंचायतीची निवडणूक जवळ आली आहे. माणगाव नगर पंचायतीत मागील पाच वर्षांत घडलेल्या राजकीय घडामोडी ग्रामस्थांच्या स्मरणात असून याचा वचपा काढण्यासाठी सारेच जण उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply